मालदीवसोबतचे भारताचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. चारही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या मालदीवने भारताला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. भारत सरकारकडून भेट म्हणून देण्यात आलेले हेलिकॉप्टर परत करण्याची तयारी मालदीवने सुरु केली आहे. भारताने मालदीवच्या नौदलाला दोन हेलिकॉप्टर्स भेट म्हणून दिली होती. यापैकी एक हेलिकॉप्टर परत नेण्याची सूचना मालदीवकडून करण्यात आली आहे. मालदीवने हेलिकॉप्टर परत करण्याची तयारी सुरू केल्यामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे यासंदर्भात अब्दुल्ला यामीन सरकारशी संवाद साधला जात असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मालदीवला भारताकडून ध्रुव अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टरऐवजी (एएलएच) डॉर्नियर मॅरिटाईम सर्विलान्स एअरक्राफ्ट हवे आहे. त्यामुळे यावर काय तोडगा काढला जातो, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.मालदीवला जे हेलिकॉप्टर भारताला परत करायचे आहे, ते अद्दू बेटावर तैनात आहे. मात्र हे हेलिकॉप्टर परत करण्याची तयारी मालदीवने सुरु केल्यामुळे भारत आणि मालदीवमधील सुरक्षा संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला असताना मालदीवकडून हेलिकॉप्टर परत करण्याचे वृत्त आल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे. चीनकडून मालदीवमध्ये मोठी गुंतवणूक केली जात आहे. चीनने मालदीवमध्ये पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्याचा धडाका लावला आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांच्या मदतीने चीनकडून 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स'ची उभारणी केली जाते आहे. यामुळे भारताची मोठी कोंडी होऊ शकते. त्यातच काल पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवा यांनी रविवारी मालदीवचा दौरा केला. मालदीव, चीन आणि पाकिस्तानची ही जवळीक भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
मालदीवचा भारताला धक्का; भेट दिलेलं हेलिकॉप्टर परत देण्याची तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 11:04 AM