Maldives vs India: मालदीवमध्येभारतीय लष्कराच्या तैनातीवरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. याचदरम्यान, एक महत्त्वाची घटना घडली आहे. मालदीवमध्येभारतीय लष्करी जवानांच्या तैनातीबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ चर्चेसाठी दिल्लीत पोहोचले आहे. शिष्टमंडळात राजकीय आणि लष्करी प्रतिनिधींचा समावेश आहे. भारतासोबत या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या कोअर ग्रुपच्या बैठकीत ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमधून भारतीय लष्करी जवानांना हटवण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर कोअर ग्रुप तयार करण्यात आला. भारतीय सैनिक मालदीवमध्ये माणुसकीच्या हेतूने तैनात आहेत. १४ जानेवारी रोजी माले येथे कोअर ग्रुपची पहिली बैठक झाली. पहिल्या बैठकीनंतर भारताकडून एक निवेदन जारी करण्यात आले. 'मालदीवच्या लोकांना माणुसकीच्या नात्याने आणि वैद्यकीय आपत्कालीन बचाव सेवा प्रदान करणाऱ्या विमानचालन प्लॅटफॉर्मच्या सततच्या सेवांना अनुमती देणारे परस्पर व्यावहारिक उपाय शोधण्यावर या बैठकीत चर्चा झाली,' असे त्यात म्हटले होते.
मालदीव भारताच्या विरोधातच
दरम्यान, या बैठकीबाबत मालदीवची भूमिका वेगळी होती. मालदीवने सांगितले होते की, भारतीय लष्करी जवानांना लवकरात लवकर मायदेशी पाठवण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर या बैठकीत भर देण्यात आला. मालदीवमध्ये सत्तेत आल्यापासून मोहम्मद मुइज्जू भारतीय सैन्याच्या माघारीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. त्यांनी आपली संपूर्ण निवडणूक 'इंडिया आऊट'च्या या मुद्द्यावर लढवली.
भारतीय सैनिक काय करत आहेत?
भारतीय लष्कराचे सुमारे ७७ जवान मालदीवमध्ये आहेत. हे लष्करी जवान मालदीवच्या लोकांच्या मदतीसाठी आहेत. येथे दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान आहे, ज्यांनी आतापर्यंत शेकडो वेळा लोकांना मदत केली आहे. मालदीवमध्ये उपस्थित असलेले भारतीय सैनिक ही विमाने आणि हेलिकॉप्टर चालवतात. COP-28 दरम्यान PM मोदी आणि अध्यक्ष मुइज्जू यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर कोअर ग्रुप तयार करण्यावर एकमत झाले होते.