भारतासोबत असलेल्या वादामुळे नेहमीच चर्चेत राहणारे मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याच सरकारमधील एका महिला मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिला मंत्र्याचं नाव फातिमा शमनाज अली सलीम आहे. त्या मुइज्जू सरकारमध्ये पर्यावरण मंत्री आहेत.मुइज्जू यांच्यावर काळी जादू केल्याचा आरोपाखाली फातिमा यांच्यासोबत आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामधील एक फातिमा या भाऊ आहे. अटकेची कारवाई केल्यानंतर सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने या आरोपींना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.
तत्पूर्वी पोलिसांनी फातिमा यांच्या निवासस्थानी टाकलेल्या धाडीमध्ये अनेक आक्षेपार्ह वस्तू सापडल्या होत्या. फातिमा ह्या काळी जादू करण्यासाठी या वस्तूंचा वापर करत होत्या, असा दावा करण्यात येत आहे.
राष्ट्रपती मुइज्जू यांची मर्जी संपादन करण्यासाठी फातिमा शमनाज ह्या काळी जादू करत होत्या, असाही दावा करण्यात येत आहे. मुइज्जू सरकारमध्ये मंत्री असलेल्या फातिमा यांना आणखी चांगलं पद मिळवायचं होतं. दरम्यान, मुइज्जू यांच्या पत्नी आणि मालदीवच्या फर्स्ट लेडी यांनी बदल्याच्या भावनेतून फातिमा शमनाज यांना या प्रकरणात अडकवल्याचाही दावा केला जात आहे. फातिमा शमनाज यांनी मुइज्जूच्या पत्नीचा एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यात त्या कुठल्यातरी पबमध्ये गाणं गाताना आणि नाचताना दिसत होत्या. त्याचाचा वचपा या प्रकरणातून काढण्यात आल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, मुइज्जू सरकारमध्ये पर्यावरण मंत्री बनण्यापूर्वी फातिमा शमनाज ह्या माले सिटी कौन्सिलमध्ये हेनविरू दक्षिणच्या कौन्सिलर होत्या. एप्रिल महिन्यात मुइज्जू सरकारमध्ये मंत्री बनल्यानंतर त्यांनी कौन्सिलर पदाचा राजीनामा दिला होता. तत्पूर्वी त्या राष्ट्रपतींच्या कार्यालयात मोठ्या हुद्द्यावर काम करत होत्या. फातिमा ह्या राष्ट्रपती मुइज्जू आणि त्यांच्या पत्नीचे निकटवर्तीय असलेल्या एका मोठ्या अधिकाऱ्याच्या माजी पत्नी आहेत. या दोघांचा हल्लीच घटस्फोट झाला आहे.