India Maldives Relationship, China: गेल्या काही महिन्यांमध्ये मालदीव आणि भारत यांच्यातील राजकीय संबंधांमध्ये मिठाचा खडा पडला होता. मालदीवनेभारतीय जवानांची तुकडीही भारतात परत पाठवून दिली होती. पण आता मात्र हळूहळू चित्र वेगळं दिसत आहे. मालदीवच्या एका वरिष्ठ मंत्र्याने पहिल्याच चीन दौऱ्यावर राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्या नुकत्याच झालेल्या नवी दिल्ली भेटीवर भाष्य केले. महत्त्वाची बाब म्हणजे, देशाच्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी भारतासोबतच्या संबंधांचा उल्लेख त्यांनी या भाषणात केला. आर्थिक विकास आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांनी हे विधान केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुइझू ९ जून रोजी भारतात आले होते. मुइझू हे चीनला पोषक विचारसरणी असणारे मानले जातात. पण डालियानमधील १५व्या जागतिक आर्थिक मंचावर (WEF) सहभागी झालेले मोहम्मद सईद यांनी मात्र CNBC इंटरनॅशनल टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की भारत आमचा सर्वात जवळचा शेजारी आहे असा उल्लेख राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी केला आहे.
भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सईद म्हणाले की, भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध प्रदीर्घ काळापासून चांगले आहेत. विशेषत: भारतातून येणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत हा देश आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. मालदीवमध्ये भारताची मोठी गुंतवणूक आहे. तसेच, नवी दिल्लीहून माले येथे परतल्यावर राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी समारंभाचे वर्णन मालदीवसाठी एक 'महत्त्वपूर्ण यश' म्हणून केले होते. दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची होती असेही त्यांचे मत होते. याच भेटीबाबतचा उल्लेख चीनला भेट देणारे सईद यांनी केला.