नवी दिल्ली - मालदीवमध्ये आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी लष्कराला सज्ज ठेवण्यात आले आहे. मालदीवमधून भारतीय पर्यटकांची सुखरुप सुटका असो किंवा लष्करी हस्तक्षेप कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सुरक्षा पथके पूर्णपणे सज्ज आहेत. लष्कराला कृती करण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतेही राजकीय निर्देश मिळालेले नाहीत.
मालदीवमधल्या प्रत्येक घडामोडीवर लष्कर बारीक लक्ष ठेऊन आहे. अत्यंत कमीवेळात जवानांची तिथे तैनाती होऊ शकते. पश्चिम किनारपट्टीवर भारतीय नौदलाच्या दोन युद्धनौका सतत गस्तीवर असतात. गरज पडल्यास त्या मालदीवकडे वळवण्यात येतील. दोन्ही देशांमधल्या संरक्षण सहकार्य करारामुळे भारताचे काही जवान मालदीवमध्ये आहेत.
आपल्या युद्धनौका, विमाने, हॅलिकॉप्टरची या भागात नेहमीच गस्त सुरु असते. किनारपट्टी टेहळणी रडार सिस्टिम बसवण्यासाठी भारत मालदीवला मदत करत आहे. नैसर्गिक संकट किंवा अन्य प्रसंगात शेजारच्या देशांच्या मदतीसाठी युद्धनौका, तुकडया आणि विमाने नेहमीच सज्ज असतात. भारतीय हवाई दलाकडे C-130J सुपर हरक्युल्स, C-17 Globemaster-III ही वाहतूक विमाने आहेत. ज्याच्या मदतीने एअरलिफ्ट आणि सैन्य तुकडया तात्काळ तैनात करता येऊ शकतात. छोटया धावपट्टयांवर उतरण्याची या विमानांची क्षमता आहे. यापूर्वी भारताने 1988 साली मालदीवला लष्करी मदत केली होती.
नेमक काय घडतय मालदीवमध्ये
मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विरोधी पक्ष सातत्याने भारताने याविषयी काहीतरी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी करत आहेत. मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष एमडीपीचे नेते मोहम्मद नाशीद यांनी भारताने लष्करी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
परिस्थिती चिघळलेली असताना भारताने अद्यापपर्यंत दूतही न पाठवणे दुर्देवी असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष यामीन चीनच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप मालदीवमधल्या विरोधी पक्षांनी केला आहे. राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर मालदीवचे विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमुर्तींना अटक करण्यात आली आहे.