नवी दिल्ली: मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू हे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यानंतर मायदेशी परतले आहेत. मालदीवमध्ये परत येताच त्यांनी आमच्यावर दादागिरी करण्याचा अधिकार कोणाला नाहीय, असे स्पष्टपणे सांगितले.
मोहम्मद मुइज्जू म्हणाले की, आपण एक छोटासा देश असू शकतो. पण त्यामुळे आपल्याला धमकावण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही. मोहम्मद मुइज्जू यांनी कोणाचेही नाव घेऊन थेट हे वक्तव्य केलेले नाही. मात्र त्यांनी हे वक्तव्य करुन भारताला डिवचले असल्याचे म्हटलं जात आहे.
चीन समर्थक मानल्या जाणाऱ्या मोहम्मद मुइज्जू यांनी पाच दिवसांच्या चीन दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल निलंबित करण्यात आले असताना त्यांचा हा दौरा झाला. या मुद्द्यावरून भारत आणि मालदीवमध्ये राजकीय वाद वाढत आहेत.
मोहम्मद मुइज्जू यांनी चीनकडे मागितली दाद
मालदीववर बहिष्कार घालण्याच्या भारतात सुरू असलेल्या ट्रेंडमध्ये मोहम्मद मुइज्जू यांनी चीनला मालदीवमध्ये अधिकाधिक चिनी पर्यटक पाठवण्याचे आवाहन केले होते. मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना मोहम्मद मुइज्जू म्हणाले होते की, कोरोनापूर्वी आपल्या देशात येणारे बहुतेक पर्यटक हे चीनचे होते.
नेमका वाद काय?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांनी मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यातील काही फोटोंवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तेव्हापासून दोन्ही देशांमधील राजकीय वाद अधिक वाढला आहे. या प्रकरणाचा वाद वाढल्यानंतर या तिन्ही मंत्र्यांना निलंबित करण्यात आले.