नवी दिल्ली- पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो वा अंतर्गत अशांतता भारताने मालदिवला नेहमीच मदत केली आहे. दक्षिण आशियामध्ये भारत एक महत्त्वाची भूमिका बजावत असताना मालदिवने मात्र आता नवीन पद्धतीने भारताविरोधी भूमिका घेतली आहे. भारताने मालदिवच्या लामू बेटावर भेट म्हणून ठेवलेले दुसरे हेलिकॉप्टर परत घेऊन जावे असे मालदिवने भारताला सांगितले आहे.
(या हेलिकॉप्टर्सचा मालदिवने अनेकवेळेस उपयोग केला आहे, रुग्णांना तात्काळ उपचार पुरवण्यासाठीही त्याची मदत झाली आहे.)लेटर ऑफ एक्सचेंजनुसार भारताने आपली दोन हेलिकॉप्टर्स मालदिवमध्ये ठेवली आहेत. त्याची मुदत जून महिन्याच्या अखेरीस संपत आहे. या लेटर ऑफ एक्सचेंजचे नुतनीकरण करण्यासाठी भारताने प्रयत्न केल्यावर त्याला मालदिवने सरळ नकार दिलाच त्याहून तुमची दोन्ही हेलिकॉप्टर्स परत घेऊन जा असे थेट उत्तर मालदिवने दिले आहे.अद्दू येथे भारताने ठेवलेले हेलिकॉप्टर परत न्यावे असे मालदिवने यापुर्वीच स्पष्ट सांगितले होते. आता लामू येथिल हेलिकॉप्टरसुद्धा परत न्यावे असे त्यांनी सांगितले आहे. भारत सरकारने मालदिवला भेट म्हणून 2 हेलिकॉप्टर्स मालदिवमध्ये ठेवली होती. पण त्या हेलिकॉप्टर्सच्या देखभालीसाठी भारतीय नौदलाचे कर्मचारी मालदिवमध्ये राहिल्यामुळे मालदिवचे यामिन यांचे सरकार अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येते. भारताचे सहा वैमानिक आणि डझनभर इतर कर्मचारी या हेलिकॉप्टर्सच्या देखभालीसाठी तेथए राहिले आहेत. भारताद्वारे सुरु असलेल्या सर्व मदतकार्यांमध्ये भारतातून येणाऱ्या कुशल कर्मचाऱ्यांना नव्याने प्रवेश देऊ नयेत असे मालदिव सरकारने इमिंग्रटंस डिपार्टमेंटला आदेश दिल्याचे सांगण्यात येते. यामुळे भारताद्वारे सुरु असणारे प्रकल्प रखडले आहेत. तसेच भारत मालदिवमध्ये पोलीस अकादमी बांधून देत आहे, ते कामही संथगतीने होत आहे.मालदिवमध्ये चीन बंदर बांधण्याच्या हालचाली करत असून दिएगो गार्सियाप्रमाणे येथे नाविक तळाची तयारीही चीनची आहे. त्यामुळे या प्रदेशात भारताची हेलिकॉप्टर्स दूर करण्यास मालदिवने सांगितले असावे.