पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यामुळे मिरच्या झोंबलेल्या मालदीवला भारतीयांनी धडा शिकविण्यास सुरुवात केली आहे. हजारो लोकांनी मालदीवला फिरायला जाण्याचे रद्द केले असून बुकिंगही कॅन्सल केली आहेत. मालदीवच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने भारतीयांवर गलिच्छ टीका केल्याने भारतीयांनी सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीव सुरु केले आणि मालदीवच्या पायाखालची वाळू सरकली आहे. थोड्याच वेळापूर्वी मालदीवच्या सरकारने यावर खुलासा करणारे स्टेटमेंट जारी केले आहे.
काल रात्रपासून मालदीव सरकारची वेबसाईट क्रॅश झाली होती. आता सुरु होताच मालदीव सरकारने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मालदीव सरकारला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर परदेशी नेते आणि उच्चपदस्थ व्यक्तींविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याची माहिती आहे. ही मते वैयक्तिक आहेत आणि मालदीव सरकारच्या या मतांचे प्रतिनिधित्व करत नाही. सरकारचे संबंधित अधिकारी अशी अवमानकारक टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असे मालदीवने म्हटले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर लोकशाही आणि जबाबदारीने करायला हवा. द्वेष, नकारात्मकता पसरवणार नाही आणि मालदीव आणि त्याचे आंतरराष्ट्रीय भागीदार यांच्यातील घनिष्ठ संबंधांना बाधा आणू नये अशा प्रकारे केले पाहिजे, यावर मालदीवचा विश्वास आहे, असे मालदीवने म्हटले आहे.