माले : मालदीवचेचीन समर्थक राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईज्जू यांच्या पक्षाने संसदीय निवडणुकीत ९३ पैकी ७१ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले. हा विजय त्यांच्या चीन समर्थक परराष्ट्र धोरणाचे जोरदार समर्थन म्हणून पाहिले जाते. या निकालाकडे भारतासह चीनचेही लक्ष लागले होते.
मोईज्जूंच्या नेतृत्वाखालील पीएनसने निवडणुकीत ९३ पैकी ६८ जागांवर विजय मिळवला आणि त्यांचा सहकारी पक्षांनी ३ जागांवर विजय मिळवला. भारत समर्थक इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या एमडीपीने मागील संसदेत ६५ जागा जिंकल्या होत्या; परंतु यावेळी त्यांना केवळ १५ जागा जिंकता आल्या.
चीन समर्थक मोईज्जू (४५) यांनी आपल्या देशावरील भारताचा प्रभाव कमी करायचा आहे, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. मोईज्जू यांच्या पक्षाने २०१९ मध्ये ६४ जागांवर विजय मिळविला होता. मालदीवच्या बाहेर ज्या देशांमध्ये मतपेट्या मतदानासाठी ठेवण्यात आल्या होत्या त्यामध्ये भारतातील तिरुअनंतपुरम, श्रीलंकेतील कोलंबो आणि मलेशियामधील क्वालालंपूर यांचा समावेश आहे.