अमेरिकन विमानतळावर एका भारतीय महिला उद्योगपतीला दिलेल्या वागणुकीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेच्या एअरपोर्टवर FBI अधिकाऱ्यांनी ८ तास ताब्यात ठेवल्याने महिलेची फ्लाईट चुकली. याबाबत महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. एका पुरुष अधिकाऱ्याने कॅमेऱ्याच्या देखरेखीत माझी शारीरिक तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार महिलेने सांगितला.
श्रुति चतुर्वेदी असं या भारतीय महिला उद्योगपतीचं नाव आहे. श्रुती यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या की, एका पुरुष अधिकाऱ्याने माझी शारीरिक तपासणी केली. मला ८ तास एफबीआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात ठेवले. हे सर्व यासाठी झाले कारण माझ्या हँडबॅगमध्ये पॉवर बँक होती. अलास्काच्या एंकोरेज एअरपोर्टवरील सुरक्षा रक्षकांना हे संशयित वाटले. त्यामुळे मला ८ तास ताब्यात ठेवले. या काळात मला टॉयलेटलाही जाण्याची परवानगी दिली नाही असं त्यांनी सांगितले.
समजा, तुम्हाला कुणी विना काही कारण ८ तास बसवून ठेवले जाईल. काहीही प्रश्न विचारले जातील. कॅमेऱ्यासमोर पुरुष अधिकारी तुमची शारीरिक चाचणी घेईल. तुमचे उष्णतेचे कपडे, मोबाईल, पर्स सर्व काही हिसकावून घेतले जाईल. थंड खोलीत ठेवले जाईल. टॉयलेटलाही जाऊ दिले नाही. ना तुम्ही कुणाला कॉल करू शकता, तुमची फ्लाईटही चुकेल. हे सर्व माझ्यासोबत झालं कारण माझ्या हँडबॅगमध्ये एक पॉवर बँक होते. ज्याला तिथल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी संशयास्पद मानलं होते असं श्रुती चतुर्वेदी यांनी म्हटलं.
दरम्यान, श्रुती चतुर्वेदी यांनी त्यांची ही पोस्ट भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र विभागाला टॅग केले आहे. मला अजून कल्पना करण्याची गरज नाही कारण मी आधीच माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट ७ तास घालवलेत. हे का झाले सर्वांना माहिती आहे असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं. याआधी श्रुती यांनी अलास्का दौऱ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र हा अनुभव त्यांच्या कायम कटू आठवणीत राहिला आहे.