लंडन - भारतातील बँकांचे तब्बल 9 हजार कोटी बुडवून देशाबाहेर पळालेला मद्यसम्राट विजय माल्ल्याच्या आडचणीत वाढ झाली आहे. कारण इंग्लंडमधील न्यायालयाने भारतीय बँकांचा दीड अब्ज डॉलर्सचा दावा वैध ठरवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर विजय मल्ल्याच्या वकिलांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिलेली नाही.
बँक घोटाळ्यातील आरोपी व किंगफिशर एअरलाइन्सचा सर्वेसर्वा विजय मल्ल्याच्या जगभरातील सर्व संपत्तीच्या जप्तीचा मार्ग मंगळवारी मोकळा झाला. लंडनच्या न्यायालयाने भारतीय बँकांच्या बाजूने निर्णय दिला. दिल्लीच्या न्यायालयानेही आजच त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. आता भारतीय बँका कर्ज वसुलीलवादाच्या आदेशानुसार मल्ल्याची जगभरातील १.५५ अब्ज डॉलर्सची (जवळपास १० हजार २३० कोटी रुपये) संपत्ती जप्त करू शकणार आहेत.आयडीबीआयसह विविध बँकांकडून घेतलेल्या ९१०० कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न करता मल्ल्याने २०१६ साली भारतातून पळ काढला. त्यानंतर कर्जवसुली लवादाने त्याच्या सर्व मालमत्ता गोठविण्याचे निर्देश दिले. मागील वर्षी मल्ल्याला लंडनमध्ये अटक झाली. पण भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी मल्ल्याने न्यायालयात याचिका केली होती. त्याचवेळी आयडीबीआय बँकेसह अन्य बँकांनीही मल्ल्याविरोधात अर्ज केला होता. त्यावर निकाल देताना लंडन न्यायालयाचे न्या. अँड्रू हेन्सन यांनी, मल्ल्याची याचिका फेटाळली. मल्ल्याचे घोटाळा केला आहे. यामुळे कर्जवसुली लवादाचा संपत्ती जप्तीचा आदेश योग्यच आहे. न्यायालय त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे न्या. हेन्सन यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)