Malaysia Visa-Free Entry :मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी नुकतीच एक महत्वाची घोषणा केली आहे. मलेशियाने आपल्या देशातील पर्यटन विकासासाठी तसेच आर्थिक प्रगतीकरिता मोठे पाऊल उचलले आहे. मलेशियामध्ये भारतीय नागरिकांना ३० दिवसांसाठी मोफत व्हिसा दिला जाणार आहे. ही व्हिसा फ्री एंट्री १ डिसेंबरपासून लागू होणार आहे. पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी ही घोषणा त्यांनी पीपल्स जस्टिस पार्टीच्या काँग्रेसमधील भाषणादरम्यान केली. मात्र, व्हिसा-फ्री प्रवेश पुढे किती काळासाठी लागू असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
मलेशियामध्ये चीन आणि भारतातुन सर्वाधिक पर्यटक जातात. शिवाय मलेशियासाठी चीन आणि भारत या प्रमुख बाजारपेठा आहेत. चीन मलेशियासाठी चौथी तर भारत त्याची पाचवी सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी तसेच व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवत मलेशियाने ही घोषणा केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान मलेशियामध्ये ९० लाख १६ हजार पर्यटक आले, त्यात चीनमधून ४ लाख ९८ हजार ५४० आणि भारतातून २ लाख ८३ हजार पर्यटक आले.
पर्यटनाला चालना देण्यासाठी घेतला निर्णय :
मलेशियाने भारतीयांना मोफत व्हिसा फ्री एंट्री दिली आहे. ज्याचा फायदा देशातील पर्यटकांची संख्या वाढण्याकरिता होईल. कोविडकाळात आणि त्यानंतर मलेशियात भारतीय आणि चिनी पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यासाठी मलेशिया सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मलेशियाच्या शेजारील देश थायलंडनेही देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी असेच पाऊल उचलले होते. थायलंडच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाची मोठी भूमिका आहे, त्यामुळे थायलंडने ही घोषणा केली होती. थायलंडने नोव्हेंबरच्या सुरुवातीला आपल्या देशात भारतीयांसाठी मोफत व्हिसा प्रवेशाची घोषणा केली. त्यानंतर आता मलेशियाच्या निर्णयाने पर्यटकांचे लक्ष वेधले आहे. भारतीय नागरिकांना थायलंडमध्ये १० नोव्हेंबर २०२३ ते १० मे २०२४ पर्यंत ३० दिवसांसाठी मोफत व्हिसा मिळु शकतो.