ब्रिटनच्या एका कोर्टाने एका तरूणाबाबत निर्णय दिला आहे की, त्याला कोणत्याही महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या २४ तासांआधी पोलीस, महिला दोघांनाही माहिती द्यावी लागेल. सोबतच तरूण एखाद्या महिलेसोबत बिनकामाचं काही बोलत असेल तर त्यावरही बंदी राहील.
३९ वर्षीय तरूण डीन डायरवर लैंगिक हल्ल्याचे अनेक आरोप आहेत. एका महिलेने या तरूणावर आरोप लावला होता की, पार्टीमध्ये त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. याचा विरोध केला तर त्याने बलात्काराची धमकी दिली होती. असं असलं तरी आतापर्यंत त्याच्यावरील कोणताही लैंगिक अत्याचाराच्या आरोप सिद्ध झालेला नाही.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, कोर्टाने तरूणाविरोधातील आरोप ऐकल्यावर त्याला सेक्शुअल रिस्ट्रेन्ट ऑर्डर दिली आहे. या तरूणावर १४ वर्षांच्या एका मुलीसोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न यासहीत लैंगिक अत्याचाराचे सात आरोप आहेत.
ब्रिटनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने असेही म्हटले की, दैनंदिन काम करत असताना हा तरूण केवळ त्याच महिलांसोबत बोलू शकतो ज्या त्याच्यासोबत बोलतील. बोलणं शक्य नसलेल्या महिलांसोबत त्याने बोलू नये. दरम्यान, ब्रिटनमध्ये सेक्शुअल रिस्ट्रेन्ट ऑर्डर एक सिव्हिल ऑर्डर असतो. ज्या लोकांवर कोणताही आरोप सिद्ध झाला नाही अशांना तो लावला जातो. त्यांना सोसायटीसाठी धोका समजलं जातं.