लंडन: ब्रिटिश व्यक्तीच्या शरीरातून जगातील सर्वाधिक आकाराच्या किडनी काढण्यात आल्या आहेत. या किडन्यांचं वजन तब्बल ३५ किलो इतकं आहे. पॉलिसिस्टिक किडनी आजार झाल्यानं वॉरन हिग्ज यांचा जीव धोक्यात सापडला होता. दोन्ही किडनींचा आकार वाढल्यानं त्यांना श्वास घेण्यास त्रास व्हायचा. त्यामुळे त्यांच्यावर दोन आठवड्यांपूर्वी शस्त्रक्रिया करावी लागली. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका येऊन गेला. त्यातून सावरण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या चर्चिल रुग्णालयात वॉरन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शरीरातून काढण्यात आलेल्या दोन्ही किडनींचं वजन तब्बल ३५ किलो इतकं भरलं. या जगातील सर्वाधिक वजनाच्या आणि आकाराच्या किडन्या ठरल्या आहेत. याआधी भारतातील एका व्यक्तीच्या शरीरातून ७.४ किलो वजनाच्या किडनी काढण्यात आल्या होत्या. वॉरन ब्रिटनमधील विंडसरमध्ये वास्तव्यास आहेत.
वॉरन यांच्या शरीरात उजव्या बाजूला असलेल्या किडनीचं वजन १५ किलो भरलं. त्यात ५ किलोचे द्रवपदार्थ साठले होते. केवळ किडनीचं वजन असो वा किडनीचं त्यासोबतच्या द्रवपदार्थासोबतच वजन असो, सर्वच बाबतीत जगातील विक्रम मोडले आहेत, असं मला डॉक्टरांनी सांगितलं. मात्र ही अभिमानास्पद बाब नाही, असं वॉरन यांनी सांगितलं.
पाच वर्षांपासून वॉरन यांच्या किडनींमध्ये द्रवपदार्थ जमा होऊ लागला. त्यामुळे त्यांच्या किडनींचा आकार वाढू लागला. किडनीचा आकार तब्बल पाचपटीनं वाढल्यानं विविध समस्या निर्माण झाल्या. त्यांच्या फुफ्फुसांवर, पोटावर आणि हृदयावर परिणाम होऊ लागला. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया दोन तास चालली. शस्त्रक्रिया दूर झाल्यानं वॉरन यांच्या जीवाला असलेला धोका दूर झाला आहे.