टेक्सास: सेल्फीच्या वेडापायी जीव गमावल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या आणि वाचल्या असतील. मात्र टेक्सासमधील एका तरुणाची तुरुंगवारी केवळ एका सेल्फीमुळे टळली आहे. टेक्सासचा रहिवासी असलेल्या 21 वर्षीय ख्रिस्तोफर प्रिकोपियावर त्याच्या पूर्वाश्रमाच्या प्रेयसीनं गंभीर आरोप केला होता. ख्रिस्तोफरनं घरात घुसून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप तिनं केला. यानंतर पोलिसांनी ख्रिस्तोफरला अटक केली आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली. मात्र एका सेल्फीमुळे ख्रिस्तोफरचा 99 वर्षांचा तुरुंगवास टळला. ख्रिस्तोफरनं घरात घुसून कटरच्या सहाय्यानं छातीवर एक्स अक्षर काढलं, असा गंभीर आरोप ख्रिस्तोफरच्या माजी प्रेयसीनं केला होता. 20 सप्टेंबरला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ख्रिस्तोफर आपल्या घरात घुसला होता, अशी माहिती तिनं पोलिसांनी दिली होती. मात्र त्यावेळी आपण आपल्या कुटुंबासोबत बाहेर होतो, असा दावा ख्रिस्तोफरनं केला. मात्र पुरावा नसल्यानं त्याची रवानगी तुरुंगात झाली. काही दिवसांनी दीड लाख डॉलर भरल्यावर त्याला जामीन मिळाला. मात्र 99 वर्षे तुरुंगावासाची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर होती. अखेर आईनं काढलेला एक सेल्फी ख्रिस्तोफरच्या कामी आला. विशेष म्हणजे हा सेल्फी त्याच्या आईनं फेसबुकवर वेळ आणि ठिकाणासह त्याचवेळी शेअर केला होता. त्यामुळे ख्रिस्तोफर 20 सप्टेंबरच्या संध्याकाळी कुटुंबासह बाहेर होता, हे सिद्ध झालं. आपण कुटुंबासोबत ज्या ठिकाणी गेलो होतो, ते ठिकाण माजी प्रेयसीच्या घरापासून 65 मैल दूर आहे, याची माहितीदेखील ख्रिस्तोफरनं पोलिसांना दिला. त्यामुळे पोलिसांनी त्याची निर्दोष मुक्तता केली. मात्र ख्रिस्तोफरवर खोटा आरोप करणाऱ्या माजी प्रेयसीला अद्याप तरी अटक झालेली नाही.
सेल्फी आला तरुणाच्या कामी; 'ती'ने केलेले आरोप ठरले खोटे अन् टळली बदनामी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 7:01 PM