इंडोनेशिया: आईची शवपेटी अंगावर पडून मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना इंडोनेशियात घडली आहे. सुलावेसी बेटावर रविवारी ही घटना घडली. आईच्या अंत्यसंस्कारासाठी शवपेटी बांबूच्या शिडीवरुन नेत असताना मुलाला बांबूच्या पायऱ्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे शवपेटी अंगावर पडून मुलाचा करुण अंत झाला. उत्तर तोराजामधील पॅरिंगडिंग खोऱ्यातील चाळीस वर्षांच्या सामेन कोंडोरुरा त्यांच्या आईचा मृतदेह घेऊन नातेवाईकांसह अंत्यसंस्कारासाठी जात होते. इंडोनेशियन प्रथा परंपरेनुसार उंचावर असलेल्या आणि बांबूपासून तयार करण्यात आलेल्या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात. या ठिकाणी जाण्यासाठी बांबूची शिडी असते. या जागेला लक्किअन असं म्हटलं जातं. सामेन त्यांच्या आईची शवपेटी घेऊन लक्किअनची शिडी चढत होते. त्यावेळी त्यांना शिडीचा अंदाज आला नाही. याशिवाय शिडीदेखील चांगल्या स्थितीत नसल्यानं ती एकाबाजूला कलली. त्यामुळे सामेन यांचा तोल गेला आणि ते काही मीटर अंतरावर जाऊन पडले. यावेळी खांद्यावर असणारी शवपेटीदेखील त्यांच्या अंगावर पडली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. 'आईची शवपेटी लक्किअनवर नेत असताना अचानक शिडी एका बाजूला कोसळली. त्यामुळे शवपेटी पडली आणि त्याखाली आल्यानं सामेन यांचा मृत्यू झाला,' अशी माहिती तोराजाचे मुख्य पोलीस आयुक्त जुलिआंतो सिराईट यांनी दिली. शिडी व्यवस्थित नसल्यानं हा अपघात झाला, असं सिराईट म्हणाले. यानंतर सामेन यांच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मृतदेह त्यांच्या आईच्या मृतदेहाशेजारीच दफन करण्यात आला.
दुर्दैव! आईची शवपेटी अंगावर पडून मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 11:09 AM