पती-पत्नीच्या सहजीवनाच्या गोष्टी आपण ऐकतो. संकटात एकमेकांना दिलेली खंबीर साथ, बिकट परिस्थितीतही न सोडलेला हात, याच्या कहाण्या आपण सिनेमात पाहतो. अनेकदा प्रत्यक्षातही अशा कहाण्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र मृत्यूनंतरही एखाद्यानं आपल्या साथीदाराची साथ सोडली नसेल तर? बँकॉकमधील एका घटनेनं याचा प्रत्यय आला आहे.
बँकॉकमधील एक ७२ वर्षीय वृद्ध त्याच्या पत्नीच्या मृतदेहासोबत तब्बल २१ वर्ष राहिला. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यानं तिचा मृतदेह शवपेटीत ठेवला. पत्नीपासून वेगळं व्हायचं नसल्यानं त्यानं हा निर्णय घेतला. Charn Janwatchakal असं या व्यक्तीचं नाव आहे. थायलंडच्या सैन्यात डॉक्टर म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यांचं त्यांच्या पत्नीवर निस्सीम प्रेम होतं. त्यामुळे पत्नीच्या निधनानंतर त्यांनी तिचा मृतदेह कब्रस्तानाऐवजी घरातच दफन केला. त्यांच्या पत्नीचा मृत्यू एका आजारामुळे झाला होता.
Charn यांच्या निर्णयामुळे त्यांचे दोन मुलगे घर सोडून गेले. मात्र त्यामुळे Charn यांना कोणताही फरक पडला नाही. त्यांनी पत्नीचा मृतदेह तसाच ठेवला. कधी ते पत्नीच्या मृतेदहाजवळ जाऊन गप्पा मारायचे, तर कधी तिच्या शेजारीच झोपायचे. मात्र २१ वर्षांनी त्यांनी पत्नीवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी एका संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या मदतीनं त्यांनी पत्नीच्या मृतदेहाचे अवशेष शवपेटीतून बाहेर काढले आणि विधीवत अंत्यसंस्कार केले.
Charn यांचं वय सध्या ७२ वर्षे आहे. आपल्या मृत्यूनंतर पत्नीवर अंत्यसंस्कार कोण करणार, असा प्रश्न Charn यांना भेडसावत होता. त्यामुळेच त्यांनी घरातच दफन केलेल्या पत्नीचा मृतदेह बाहेर काढून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. Charn यांची मुलाखत घेतलेले वकील Nitithorn Kaewto यांनी ही माहिती दिली.