तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन खूप सोपं झालं आहे, पण त्याचा गैरवापरही होत आहे. फक्त एका क्लिकवर एका व्यक्तीने आपल्या आयुष्यभराची कमाई गमावली आहे. मार्क रॉस असं या व्यक्तीचं नाव आहे. आपली फसवणूक झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. यामध्ये त्याचे 30,000 डॉलर म्हणजे जवळपास 84 लाख रुपये गमावले आहेत. त्याला क्रिप्टोकरन्सीची ऑफर आली होती, ज्यामध्ये गुंतवणुकीऐवजी जास्त पैसे देण्याचे सांगण्यात आले होते. पण त्याच्या खात्यात काहीच आले नाही. त्याने मदतीसाठी प्रयत्न केला असता काहीच उत्तर मिळालं नाही.
ऑस्ट्रेलियात राहणारा मार्क हा आयटी वर्कर आहे. मार्क म्हणतो, या गोष्टीनंतर मी सर्वच गमावलं आहे. माझ्याकडे रोख रक्कम नाही, नोकरी नाही, माझ्या घरचे भाडे देण्यासाठी देखील पैसे नव्हते, म्हणून मला माझ्या वृद्ध पालकांसोबत राहावे लागले. मी इथे राहिलो आणि नंतर दुसरी नोकरी मिळाली पण माझी सर्व कमाई संपली आहे. कोरोना काळात आपल्या खात्यातून सर्व पैसे काढले होते, जे त्याने एका क्लिकमुळे आता गमावले आहेत.
मार्क म्हणतो की, एक वर्षापूर्वी त्याने टेलिग्रामवर बोनस सपोर्टचा व्हिडीओ पाहिला होता. तो संशयास्पद होता, परंतु त्याला असे वाटले की जगभरातील शेकडो लोकांना चांगला रिटर्न मिळत आहे आणि अशा ग्राहकांशी त्याचं बोलणंही करून दिलं होतं, परंतु आता त्याला असे वाटते की ही सर्व बनावट खाती होती. मार्क म्हणाला की त्याने आपली संपूर्ण बचत एकाच वेळी हस्तांतरित करून मोठी चूक केली आहे.
एका स्कॅमरने नंतर त्याला सांगितले की तो त्यांचे हरवलेले पैसे परत मिळवेल आणि त्या बदल्यात $100 घेईल, पण पैसे मिळाले नाहीत आणि तेही निघून गेले. त्याचे आई-वडील नसते तर तो रस्त्यावर आला असता, असे त्याचे म्हणणे आहे. यामुळे तो खूप तणावाखाली असतो. त्याच्या मेसेजचे स्क्रीनशॉटही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो फसवणूक करणाऱ्यांकडे पैसे परत करण्याची विनंती करत आहे. त्याने पोलिसांकडे तक्रारही केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"