कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. जगभरातील रुग्णांची संख्या ही तब्बल 18 कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. जगभरातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र कधी कधी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर येत आहे.
कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सर्वच सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट सुरू असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. टिकटॉक (Tiktok) या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर एका व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर करून त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी आलेला खर्च लोकांना सांगितला आहे. कोरोनामुळे तो 4 महिने रुग्णालयात दाखल होता. त्या कालावधीतील त्याचं बिल तब्बल 20 कोटी 77 लाख रुपये आलं आहे.
टिकटॉकवर @letstalkaboutbusiness नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. यामध्ये अमेरिकेतील रुग्णालयांचं कोरोना महामारीच्या काळातील चार्ज लिस्ट देखील शेअर केली आहे. एनेस्थेशियापासून ते आयसीयूचं भाडं, मेडिकल आणि सर्जिकल उपकरणांच्या किमती आदी माहितीही त्यात दिली आहे. या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, 4 महिने कोरोनाविरोधात लढा दिल्यानंतर तो वाचला आहे. पण आता त्याला 21 कोटी रुपयांचं बिल भरावं लागणार आहे. अमेरिकेतल्या हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डशिवायच्या रूमसाठी तुम्हाला जवळपास 3 लाख 97 हजार रुपये द्यावे लागतील.
शेअरिंग खोलीचं भाडं 3 लाख 67 हजार रुपये आहे. कोरोना रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते आणि रुग्णालयांमध्ये सर्वांत महाग उपचार रेस्पिरेटरी थेरपीचा आहे. या थेरपीसाठी रुग्णांकडून तब्बल 4 कोटी 8 लाख रुपये वसूल केले जातात. याशिवाय रुग्णालयांमधील इतर सुविधादेखील महाग आहेत. चार महिने तो रुग्णालयात होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला रुग्णालयातल्या सुविधांचे दर पाहून धक्का बसला. आता त्याला 21 कोटी रुपयांचं बिल भरावं लागणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.