विजेचं बिल जास्त येतं अशी प्रत्येकाचीच तक्रार असते. पण अशात जर आपण चुकून भलतंच बिल भरतोय असं समजलं तर खूप मोठा धक्का बसेल. असंच काहीस एका व्यक्तीसोबत झालं आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये अशीत एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. केन विल्सन नावाच्या व्यक्तीने नकळत तब्बल १८ वर्षे आपल्या शेजाऱ्याचं वीज बिल भरलं आहे.
जेव्हा केनला सतत वाढत जाणारं वीज बिल येऊ लागलं तेव्हा त्याने विजेचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. केनने विजेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करूनही त्याच्या वीज बिलात काहीही फरक पडला नाही. समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी केनने आपल्या विजेच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी एक डिव्हाईस विकत घेतले.
केनच्या अपार्टमेंटमधील ब्रेकर बंद असूनही त्याचं इलेक्ट्रिक मीटर चालूच असल्याचं या डिव्हाईसने दाखवलं. या गडबडीवर केन याने पीजीअँडई वीज कंपनीशी संपर्क साधून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. तपासादरम्यान, कंपनीने केनला त्याच्या शेजाऱ्याचे वीज बिल चुकून पाठवल्याचं समोर आलं. ही गोष्ट तब्बल १८ वर्षे सुरू राहिली.
१८ वर्षांपासून, केन त्याच्या शेजाऱ्याचं बिल नकळत भरत होता. पण यात कंपनीची चूक होती. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. वीज कंपनीच्या निष्काळजीपणाबद्दल नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.