लंडन : जगप्रसिद्ध लंडन ब्रिजजवळ अतिरेकी हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. यात अनेक जण जखमी झाले. एका संशयिताला घटनास्थळीच कंठस्नान घालण्यात आले.ब्रिटनच्या राजधानीच्या हृदयस्थानी असलेल्या या भागात चाकूहल्ला झाल्यानंतर लगेच मोठा फौजफाटा, रुग्णवाहिका तैनात झाल्या असून, आणीबाणीच्या काळात लागू करण्यात येणाऱ्या सेवा बहाल करण्यात आल्या आहेत.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, घटनास्थळी पोलीस एकाला गोळ्या घालताना दिसले आहेत. त्यात हल्लेखोर जागीच ठार झाला. त्याने लोकांमध्ये घबराट पसरवण्यासाठी स्फोटकांसारखा कंबरपट्टा घातला होता. महानगर पोलीस व लंडन रुग्णवाहिका सेवेने ही फार मोठी घटना आहे, असे म्हटले आहे.स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजता स्कॉटलँड यार्ड पोलिसांना पाचारण करण्यात आले. लंडन शहर आणि महानगर पोलिसांचे विशेष पथकही घटनास्थळी शिताफीने दाखल झाले होते. लंडन शहर पोलिस विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी त्या संशयिताला गोळ्या घातल्या. तो जागीच ठार झाला, असे स्कॉटलँड यार्डच्या दहशतवादविरोधी पोलिस विभागाचे सहायक आयुक्त निल बसू यांनी सांगितले.या घटनेने लंडन ब्रिज परिसरात पळापळ झाल्याचे व्हिडिओ व काही छायाचित्रेही सोशल मीडियावर झळकली आहेत. लंडन ब्रिज परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली असून, परिसरातील कार्यालये व इमारती बंद करण्यात आल्या आहेत.ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन या घटनेबाबत म्हणाले की, या घटनेतील घडामोडींवर मी बारीक लक्ष ठेवून आहे. पोलीस व सर्व मदत करणाºया सेवा तेथे तातडीने पोहोचल्या आहेत.लंडन ब्रिजजवळ जून २०१७ मध्ये इसिस समर्थित हल्ल्यामध्ये ११ जण ठार झाले होते. त्यावेळी एक व्हॅनने पादचाºयांना चिरडले होते. याच महिन्याच्या प्रारंभी ब्रिटनने अतिरेकी हल्ल्याच्या धोक्याची शक्यता कमी असल्याचे जाहीर केले होते.
जगप्रसिद्ध लंडन ब्रिजजवळ चाकूहल्ला, हल्लेखोराला पोलिसांनी केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 3:08 AM