प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते. काहींना चित्रपट पाहण्याची आवड असते, तर काहींना टीव्हीवरच्या सीरियल्स पाहण्याची सवय असते. बऱ्याचदा या सवयी व्यसन बनतात. वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांची आवड असलेले अनेक जण पाहायला मिळतात. काही जण एखादा इव्हेंट असेल तर तो पाहण्यासाठी अनेक रात्री जागतात. अशाच एका व्यक्तीने मॅच पाहण्यासाठी आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम असा झाला, की आता त्याला नीट बोलताही येत नाही आणि खाता-पिताही येत नाही.
चीनमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका 26 वर्षीय मुलाने गेल्या काही दिवसांत अनेक रात्री जागून फुटबॉल वर्ल्ड कपच्या मॅचेस पाहिल्या. तमाम फुटबॉल चाहत्यांसाठी हा काळ खूप रोमांचक असला तरी या तरुणाला त्याची ही आवड चांगलीच महागात पडली आहे. त्याच्या चेहऱ्याला पॅरालिसिस म्हणजे लकवा झाला आहे. फुटबॉल पाहणं इतकं महागात पडेल, असा विचारही कधी त्याने केला नसेल.
चीनच्या वुहानमध्ये राहणारा मिस्टर काओ याने वर्ल्ड कप पाहण्यासाठी एक-दोन नव्हे तर सात रात्री जागवल्या आणि तो आता संकटात सापडला, ज्याचा त्याने विचारही केला नव्हता. सलग 7 दिवस तो ऑफिसमधून संध्याकाळी 6 वाजता घरी यायचा आणि मॅच बघायला बसायचा. सकाळी सहा वाजेपर्यंत तो मॅच पाहायचा आणि काही तासांनी तो तयार होऊन ऑफिसला जायचा. झोप न मिळाल्याने त्याला थकवा जाणवू लागला. 30 नोव्हेंबरला उठल्यानंतर त्याला खूप थकवा जाणवला. ऑफिसमध्ये थोडा ब्रेक घेऊन तो कामाचा विचार करत होता; पण त्याच्या शरीराची हालचाल होत नव्हती.
एका क्षणी, काओला असं वाटलं की त्याचे ओठ एका बाजूला वळू लागले आहेत आणि त्याला त्याच्या पापण्यादेखील मिटता येत नाहीत. लक्षण हळूहळू वाढू लागल्यावर त्याने हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तिथे डॉक्टरांनी त्याला पॅरालिसिसचा झटका आल्याने त्याचा चेहरा असा झाला असल्याचं सांगितलं. सतत जागं राहणं आणि थंडीमुळे त्याला चेहऱ्यावर पॅरालिसिसचा झटका आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते तो लवकरच बरा होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"