युरोपियन देश क्रोएशियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी जदर विमानतळावरून टेकऑफच्या तयारीत असलेल्या रयानएअरच्या विमानात एक प्रवासी ओरडत उठला आणि दरवाजा उघडण्यासाठी धावला. यावेळी विमानात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. प्रवाशाची ही कृती पाहून विमानातील बाकीचे प्रवासी घाबरले. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इंडिपेंडेंटने दिलेल्या वृत्तानुसार, विमानात गोंधळ घालणारा प्रवासी ब्रिटनचा रहिवासी आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, विमान टेक ऑफ होणार आहे, हे माहीत असतानाही हा प्रवासी अचानक आपल्या सीटवरून उठतो आणि विचित्र हावभाव करत आणि ओरडत दरवाजाकडे धावतो. दरम्यान एअर होस्टेसने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो थांबला नाही. यावेळी एअरहोस्टेसोबत झालेली धक्काबुक्की पाहून विमानातील दोन प्रवासी आपल्या जागेवरून उठले आणि गोंधळ घालणाऱ्या प्रवाशाला पकडून खाली फ्लोअरवर पाडले. फ्लोअरवर पडल्यानंतरही प्रवासी दरवाजा उघडा, दरवाजा उघडा असे ओरडत होता.
यादरम्यान विमानातील अनेक प्रवासी ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करताना दिसले. यावेळी विमानाचे उड्डाण झाले नाही, ही दिलासादायक बाब होती. त्यामुळे प्रवाशाला वेळीच विमानातून बाहेर काढून स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विमानातील एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ टिक टॉकवर अपलोड केला आहे. तसेच, हा व्हिडिओ आता ट्विटरवरही व्हायरल झाला आहे. ही घटना घडली त्यावेळी विमान धावपट्टीवर होते. विमानातील बहुतांश प्रवासी हाईडआउट क्रोएशिया म्युझिक फेस्टिव्हलमधून परतत होते. पाग बेटावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. गोंधळ घालणाऱ्या प्रवाशाला त्याच विमानतळावर विमानातून खाली उतरवून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने इंडिपेंडंटला सांगितले की, ही घटना 30 जून रोजी घडली, जेव्हा एका प्रवाशाने विमानात अचानक गोंधळ सुरू केला. त्यानंतर प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले आणि काही वेळाने विमान लंडनला रवाना झाले. प्रवासादरम्यान प्रवाशांना झालेल्या त्रास आणि गैरसोयीबद्दल विमान कंपनीने माफी मागितली आहे. मात्र, आतापर्यंत ही माहिती समोर आलेली नाही की, विमानात बसलेल्या प्रवाशाला अचानक असे काय झाले की तो दरवाजा उघडण्यासाठी उठला होता.