नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेतच्या मॅन Vs वाईल्ड या टेलिव्हीजन शो ने नवा विक्रम नोंदवला आहे. प्रसिद्ध सर्व्हायव्हल इंस्ट्रक्टर असलेल्या बेयर ग्रिल्सचा अंगावर शहारे आणणारा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा डिस्कवरी चॅनेलवरचा मोदींसमवेतचा शो सर्वाधिक ट्रेंडींग शो ठरला आहे. याबाबत खुद्द बेयर ग्रिल्सने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे. मोदींसमवेतचा शो अधिकृतपणे जगातील सर्वाधिक ट्रेडिंग शो ठरला असून 3.6 बिलियन्स इम्प्रेशन या शोला मिळाल्याचं ग्रिल्सने सांगितलंय.
जगातील कुठल्याही भागातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतून मार्ग काढून सुखरूपपणे बाहेर पडणाऱ्या बेयर ग्रिल्सचा हा शो अनेकांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय बनला होता. दरम्यान, बेयर ग्रिल्सच्या या शोमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जंगल सफारी दिसली होती. 12 ऑगस्ट रोजी हा शो टेलिकास्ट करण्यात आला होता. त्यावेळीही, खुद्द बेयर ग्रिल्स यानेच ट्विट करून माहिती दिली होती. त्यानंतर, आताही ग्रेल्सनेच ट्विटवरुन माहिती देताना, मोदींसमवेतचा शो सर्वात हीट शो ठरल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा मोदींच्या लोकप्रियतेनं नवा उच्चांक गाठल्याचे दिसून येते.
मॅन Vs वाईल्ड या शोबद्दल बोलताना बेअर ग्रिल्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. 'घनदाट जंगलात, अत्यंत खडतर परिस्थितीतही मोदी सहजपणे फिरत होते, त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य थोडंही कमी झालं नाही' असं ग्रिल्सने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. मोदींची कोणती गोष्ट तुमच्या कायम लक्षात राहील असा प्रश्न ग्रिल्सला विचारण्यात आला. त्यावर 'पावसातही मोदींच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कायम होते. ते खूप शांत आणि संयमी आहेत. संततधार पावसात जेव्हा सीक्रेट सर्व्हिसने त्यांच्यासाठी छत्री काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मी ठीक आहे असं म्हटलं आणि माझ्यासोबत ते नदीच्या दिशेने चालू लागले' असे ग्रिल्सने यापूर्वी म्हटले होते.