वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्ला ऐकणे एक व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्याच्या नादात त्याचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती आणि त्याच्या पत्नीने ट्रम्प यांच्या सल्ल्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रम्प यांनी ज्या औषधाचे नाव घेतले होते, त्याच्याशी मिळते जुळतेच एक चुकीचे औषध या पती-पत्नीने घेतले. यामुळे पतीचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी सध्या एका रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
डेली मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, कोरोना व्हायरसच्या संक्रमाणापासून बचावासाठी एका जोडप्याने फिशटँक स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल घेतले. त्यांना वाटले की हे तेच औषध आहे, ज्याचा उल्लेख राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला होता. हे केमिकल पिताच पती-पत्नीच्या प्रकृती खालावली. यानंतर या दोघांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले. येथेच पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर आहे.
कोरोना व्हायरसचा स्वतःच उपचार घेण्याच्या नादात गेला जीव -अमेरिकेतील एरिझोना येथील स्वयंसेवी संस्था बॅनर हेल्थ याप्रकरणाचा दाखला देत अमेरिकन जनतेला जागृत करत आहे. कोरोना व्हायरसचा स्वतःच उपचार करणे किती धोक्याचे ठरू शकते, हे ही संस्था सांगत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साधारणपणे या 60 वर्षीय कपलने क्लोरोक्वीन फॉस्फेट नावाचे औषध घेतले होते. या केमिकलचा वापर मास्यांचा टँक स्वच्छ करण्यासाठी केला जातो. हे केमिकल त्या महिलेच्या घरात आढळून आले आहे. हे केमिकल घेतल्यानंतर 30 मिनिटातच या जोडप्याला रुग्णालयात दाखल करावे लागलेर.
कोरोना व्हायरससंदर्भात ट्रम्प यांनी दिला होता असा सल्ला -ट्रम्प यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते, की अँटी मलेरिया ड्रग हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे कोरोना व्हायरसवरील उपचारात उपयोगी ठरू शकते. हे औषध म्हणजे देवाचे वरदान असल्याचे म्हणत, याचा वापर कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी केला जाऊ शकतो. मात्र, अमेरिकन डॉक्टरांनी, असा कोणत्याही स्वरुपाचा दावा केलेला नाही. मात्र, या औषधाचा वापर सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी याचा वापर होऊ शकतो की नाही, यासंदर्भात अद्याप स्पष्टपणे सांगता येणार नाही, असे म्हटले होते.
जगभरात 3 लाख 80 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण -
संपूर्ण जगाचा विचार करता आतापर्यंत 3 लाख 80 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 16 हजार 497 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताचा विचार करता, भारतात आतापर्यंत 492 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढलून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यापैकी 34 रुग्ण पूर्ण पणे बरे झाले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला आहे. माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार इटलीमध्ये सोमवारी कोरोणा व्हायरसमुळे आणखी 602 जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 6,078वर पोहोचला आहे.