वॉशिंग्टन : जगभरात चंद्रावर अनेक कथा लिहिल्या गेल्या आहेत; मात्र सर्वात अनोखी कथा 45 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 21 जुलै 1969 मध्ये लिहिली गेली होती. ही कहाणी होती मानवाने साक्षात चंद्र सर करण्याची. अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांनी या दिवशी चांद्रभूमीवर पहिले पाऊल ठेवले होते. आर्मस्ट्राँग यांचे चंद्रावरील हे पाऊल केवळ त्यांचेच नाही, तर संपूर्ण मानवजातीचे पृथ्वीबाहेरील पहिले पाऊल होते.
तेव्हा अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत संघात (आताचा रशिया) अंतराळात सर्वात आधी कोण जातो याची स्पर्धा सुरू होती. या स्पर्धेत रशिया अमेरिकेच्या काही पावले पुढे होता. पृथ्वीबाहेर एखादा जीव पाठविण्याचा विक्रम केवळ रशियाच्याच नावावर होता; मात्र अमेरिकेने पाठविलेल्या अपोलो-11 या अंतराळ यानाने नवी उंची गाठत मानवजातीसाठी संशोधनाचा एक नवा मार्ग उघडला. अपोलो-11 या यानाचे 16 जुलै 1969 रोजी प्रक्षेपण करण्यात आले होते. पाच दिवसानंतर म्हणजे 21 जुलै 1969 रोजी हे यान चंद्रावर उतरले. यान चंद्रावर उतरल्यानंतर नील आर्मस्ट्राँग यांनी आपले पहिले पाऊल चंद्रावर ठेवले. त्यांनी तेथील जमिनीचे काही
नमुने घेतले, तसेच छायाचित्रेही घेतली. (वृत्तसंस्था)
चंद्रावर मानव पाठविण्याच्या अमेरिकी मोहिमेचे ज्या इमारतीतून संचालन झाले त्या फ्लोरिडातील केनेडी अंतराळ केंद्रातील ऑपरेशन्स अँड चेकआऊट इमारतीला चंद्रावर पहिले मानवी पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग यांचे नाव देण्यात येणार आहे. आर्मस्ट्राँग यांचे 2क्12 मध्ये निधन झाले होते.