मेरीलँड: अमेरिकेच्या मेरीलँडमधील एका व्यक्तीनं त्याच्या घरात १०० हून अधिक साप पाळले होते. त्यात कोब्रा, ब्लॅक मांबा यासारख्या अनेक विषारी सापांचा समावेश होता. घरात साप पाळणारी व्यक्ती १९ जानेवारीला मृतावस्थेत सापडली. त्याच्या आसपास त्यानेच पाळलेले साप होते. एका सापानं दंश केल्यानंच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी आता स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेच्या मेरीलँडमध्ये १९ जानेवारीला ४९ वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत त्याच्या राहत्या घरी आढळून आली. या व्यक्तीची ओळख अद्याप समजू शकलेली नाही. व्यक्ती जमिनीवर पडलेली असल्याचं शेजाऱ्यानं खिडकीतून पाहिलं. त्यानंतर अधिकारी संबंधित व्यक्तीच्या घरी पोहोचले. तिथे त्यांना १२४ साप दिसले.
आमच्या चीफ ऍनिमल कंट्रोल ऑफिसरनं त्यांच्या ३० वर्षांच्या नोकरीत अशी घटना पहिल्यांदाच पाहिल्याचं चार्ल्स काऊंटीच्या प्रवक्त्या जेनेफर हॅरिस यांनी सांगितलं. वनाधिकारी घरात पोहोचले, त्यावेळी सगळे साप पिंजऱ्यात होते. सापांना अतिशय काळजीपूर्वक ठेवण्यात आलं होतं. घरात फारसं फर्निचर नव्हतं.
व्यक्तीचा मृत्यू सर्पदंशानं झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र त्यावेळी मुख्य वैद्यकीय निरीक्षकांनी त्याचं खंडन केलं. त्यांनी अपघाती मृत्यूचा दावा केला होता. मात्र त्या व्यक्तीचा मृत्यू सर्पदंशामुळेच झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.