एखाद्या व्यक्तीला लॉटरी लागली, तर तो व्यक्ती जीवापेक्षा जास्त त्या तिकीटाची काळजी घेईल. पण, एका व्यक्तीने चक्क 25 कोटी रुपयांच्या लॉटरीचे तिकीट दारुच्या दुकानात विसरुन आल्याची घटना घडली आहे. एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे वाटणारी ही गोष्ट एका मोटार मेकॅनिकची आहे. तो रातोरात करोडपती झाला, त्याच्यासोबत पुढे काय झालं, जाणून घ्या.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, पॉल लिटल नावाच्या व्यक्तीने जानेवारीमध्ये लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते, परंतु चुकून त्याने तिकीट एका दारुच्या दुकानात विसरले. संधी साधून स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कार्ली न्युन्सने हे तिकीट आपल्या खिशात ठेवले. यानंतर पॉलला लॉटरी ऑफिसमधून कॉल आला आणि सांगण्यात आले की, त्याने $3 मिलियन (सुमारे 25 कोटी रुपये) चा जॅकपॉट जिंकला आहे. हे ऐकून पॉल खुप खुश झाला. यानंतर त्याने लगेच त्या दारुच्या दुकानाकडे धाव घेतली. पण त्याला रिकाम्या हाताने परत यावे लागले.
यानंतर लॉटरीचे पैसे घेण्यासाठी कार्ली गुपचूप कार्यालयात पोहोचली आणि तिने तिकिटावर आपला दावा सांगितला. मात्र लॉटरी अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला. अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली असता, तिची चोरी पकडल्या गेली. तिच्यासोबत आणखी एका व्यक्तीलाही पकडण्यात आले. दुकानातील सीसीटीव्हीमध्ये तिने पॉलचे लॉटरीचे तिकीट खिशात टाकल्याचे स्पष्टपणे दिसले. तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तिच्यावर चोरी, फसवणूक, दिशाभूल करणे, असे आरोप आहेत.
दुसरीकडे गेल्या आठवड्यातच लॉटरीचा खरा विजेता पॉल लिटल याला बक्षिसाची रक्कम सुपूर्द करण्यात आली. चेक मिळाल्यानंतर पॉल खूप आनंदी होता. लॉटरीच्या पैशात आधी घर दुरुस्त करुन घेईन, असे तो म्हणाला. तसेच, पैसे मिळूनही तो मोटार मेकॅनिकचे काम सुरू ठेवणार.