न्यू यॉर्क- पुण्यात राहाणाऱ्या श्रीधर चिल्लाल यांनी आपली नखे अखेर काल कापून टाकली आहेत. सलग 66 वर्षे नखं न कापल्यामुळे चिल्लाल यांच्या डाव्या हाताची नखे लांब वाढली होती. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी ही नखं कापण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार न्यू यॉर्क येथे ही नखे कापण्यात आली.
श्रीधर चिल्लाल यांनी वयाच्या 14 व्या वर्षी नखे वाढवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागची घटनाही तशीच विचित्र आहे. त्यांच्या एका शिक्षकांनी वाढवलेले नख श्रीधर यांच्यामुळे तुटले. असे नख तुटल्यामुळे ते शिक्षक त्यांना रागावले होते. मी या नकाची किती काळजी घेतली होती हे तुला समजणार नाही अशा शब्दांमध्ये शिक्षक रागे भरल्यामुळे श्रीधर यांनी डाव्या हाताची नखे वाढवायची ठरवले. त्यानंतर त्यांनी नखे कधीच कापली नाहीत. नखे कापण्यापूर्वी त्यांच्या सर्व नखांची एकत्रित लांबी 29 फूट 10 इंच इतकी होती. त्यांच्या अंगठ्याचे नख सर्वात लांब होते.
नखांच्या काळजीबाबत बोलताना चिल्लाल म्हणतात, ही नखं अत्यंत नाजूक होती. झोपतानाही मला त्यांची काळजी घ्यावी लागायची. प्रत्येक अर्ध्या तासाने उठून नखे दुसऱ्या हाताने उचलून हाताची जागा बदलायला लागायची. नखांमुळे वेदना सहन करायला लागल्या असल्या तरी काहीवेळेस त्यांना त्याचा फायदाही व्हायचा. नखांमुळे त्यांना कोणत्याही रांगेत उभं राहावं लागलं नाही. आता त्यांची नखं रिप्लेज वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत.