सौदी अरेबियातील अनोखे कायदे सर्वदूर प्रसिद्ध आहेत. इथे दीड वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेल्या एका सौदी महिलेला तेथील विशेष न्यायालयाने ११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पण, मानवाधिकार गटांनी सौदी सरकारकडे महिलेच्या सुटकेची मागणी केली आहे. मनाहेल अल-ओतैबी असे या महिलेचे नाव आहे. ही २९ वर्षीय महिला फिटनेस ट्रेनर असून, महिला हक्क या संघटनेची एक कार्यकर्ता देखील आहे.
खरं तर महिलांचे हक्क आणि त्यांच्या कपड्यांचे समर्थन केल्याबद्दल मनाहेल हिला ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे त्यांच्या संस्थेचे म्हणणे आहे. एका संयुक्त निवेदनात ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि लंडनस्थित सौदी अधिकार संस्था ALQST ने सांगितले की, २९ वर्षीय फिटनेस ट्रेनर आणि महिला हक्क संघटनेच्या कार्यकर्त्या मनाहेल अल-ओतैबी यांना जानेवारी रोजी राज्याच्या विशेष गुन्हेगारी न्यायालयात गुप्त सुनावणी दरम्यान शिक्षा ठोठावण्यात आली. ९ जानेवारी २०२४ रोजी राज्याच्या विशेष फौजदारी न्यायालयात झालेल्या गुप्त सुनावणीदरम्यान ही शिक्षा सुनावण्यात आली होती.
दरम्यान, मनहेला अल-ओतैबी यांना तुरुंगात टाकण्याचा निर्णय सौदी सरकारने या प्रकरणाविषयी माहितीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधींच्या विनंतीला प्रतिसाद दिल्यानंतर काही आठवड्यांनंतर आला. जिनिव्हा येथील सौदी अरेबियाच्या मिशनने जानेवारीमध्ये एका पत्रात म्हटले होते की, अल-ओतैबी यांच्यावर दहशतवादी गुन्ह्यांचा आरोप आहे आणि त्यांना वैध वॉरंट अंतर्गत कायद्यानुसार अटक करण्यात आली होती.
कोण आहे मनाहेल अल-ओतैबी?मनाहेल अल-ओतैबी ह्या एक सोशल मीडिया युजर आहे. त्या इंस्टाग्राम एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि स्नॅपचॅटवर फिटनेसच्या व्हिडीओ पोस्ट करत असत. त्यांच्यावर 'देशात आणि परदेशात राज्याची बदनामी करणे, सार्वजनिक सुव्यवस्था आणि परंपरा आणि समाजाच्या चालीरीतींविरुद्ध बंड पुकारणे आणि न्यायव्यवस्थेला आव्हान देणे', असा आरोप आहे. त्यांच्या पोस्टमध्ये महिलांसाठी उदारमतवादी ड्रेस कोड, LGBTQ+ अधिकार आणि सौदी अरेबियाचे पुरुष पालकत्व कायदे संपुष्टात आणणे या बाबींचा उल्लेख होता. त्यांच्यावर असभ्य कपडे परिधान केल्याचा आणि अरबी हॅशटॅग पोस्ट केल्याचा आरोप देखील करण्यात आला, ज्यामध्ये 'सरकार उलथून टाका', असे नमूद होते.