"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन्ह पडे"
हसरा, नाचरा श्रावण आला की आपसूकच मन बालकवींच्या कवितेच्या या ओळी गुणगुणायला लागतं. श्रावणात येणारे सण, उपवास, घरामधले प्रसन्न वातावरण, उत्साह या सर्व गोष्टींची आठवण येते. उत्साह आणि आनंद यांची सांगड घालणारा, नव्या नवरीचा श्रावणात साजरा करण्यात येणारा एक सण म्हणजे "मंगळागौर".
श्रावणातील बालपणीच्या आठवणी त्यात प्रसारमाध्यमे, व्हॉट्सअॅप वगैरे वरचे मंगळागौरी पूजन आणि खेळाचे संदेश, व्हिडीओ बघून मराठमोळे मन मराठमोळ्या संस्कृती आणि परंपरेकडे आणखीच धाव घेतं आणि हे सर्वांच्याच बाबतीत होतं. म्हणूनच त्या दिवशी सगळ्या मराठी मैत्रिणी व्हॉट्सअॅप ग्रुपवर बोलत असताना "आपणही येथे म्हणजे अमेरिकेत छोट्याश्या मराठी मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये (कोविडच्या प्रतिबंधनामुळे छोटासा ग्रुप) सामूहिक मंगळागौर साजरी करायची" या सोनाली रांगणेकर आणि अर्चना टिळेकर या मैत्रिणींच्या संकल्पनेला बहुमताने संमती मिळाली आणि उत्साहाने सगळ्या जणी (सोनाली जोग ,अश्विनी देशपांडे, प्रिया जोशी, श्रुती देसाई, पल्लवी वेन्गुर्लेकर, वर्षा कोथळे, विद्या काळभोर, अनिता कात्रे, शुभांगी वानखेडे, कीर्ती पंडित, अर्चना टिळेकर, सोनाली रांगणेकर ) तयारीला लागल्यासुद्धा.
मंगळागौर खरतर मंगळवारी साजरी करतात परंतु सगळ्याच जणी नोकरी करत असल्यामुळे, कामाचा आणि हवामानाचा अंदाज घेऊन मंगळागौरीचा कार्यक्रम शुक्रवारी २७ ऑगस्टला कॉम्म्युनिटीमधेच जवळच्या ओव्हिड हॅझेन पार्क, कलार्क्सबर्ग मेरीलँड (वॉशिंग्टन डी.सी. मेट्रो एरिया ) मध्ये घायचं ठरले. आता पूजा षोडशोपचारे करायची की साधी पूजा मांडायची हा प्रश्न होता. मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्रीने करण्याचे एक व्रत आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी लग्नानंतर पाच वर्षे हे व्रत करण्यात येते. आता इथे आमच्या ग्रुप मध्ये नवविवाहिता कोणीच नव्हती. जवळपास सगळ्यांच्या लग्नांना १०-१२ वर्षांच्या वर झालेले त्यामुळे आम्ही हे व्रत षोडशोपचारे कराव की फक्त साधी पूजा मांडावी या द्विधा मनस्थितीत होतो. शेवटी घरातल्या थोरामोठ्यांच्या आणि इथल्या गुरुजींच्या सल्ल्याने सामूहिक रित्या अगदी साधी पूजा करायचे ठरले. पूजा सजावटीसाठी काय काय करायचे आणि कोणी काय आणायचे हे ठरले. विठोबा झाला आता पोटोबाची सोय लावायची होती. शुक्रवार सगळ्या नोकरीची कामे आटोपून नटून थाटून येणार म्हणून वेळ आणि शक्ती वाचावी यासाठी घरघुती जेवण मागवायचे ठरले. आता मंगळागौर म्हंटलं कि मंगळागौरीचे खेळ हे महत्वाच्या घटकांपैकी एक आहेत. ते कसे खेळायचे याचे व्हिडीओ शेअर झाले आणि कुठले खेळ खेळायचे ते पण ठरले. आता सगळ्याजणी आतुरतेने २७ ऑगस्टची वाट बघत होत्या.
कार्यक्रमाचा दिवस उजाडला, संध्याकाळी ठरल्याप्रमाणे सगळ्याजणी पार्कमध्ये भेटल्या. सगळ्या खूप सुंदर नटून थटून आल्या होत्या. नऊवारी साडी, नथ, गजरा, दागिने, मराठमोळ सौंदर्य कसं उठून दिसत होत. सर्व जणी पुजेच्या तयारीला लागल्या. पुजेच्या सजावटीसाठी रांगोळी काढण्यात आली, चौरंगावर मधोमध ताम्हणात अन्नपूर्णा मातेची प्रतिमा ठेऊन फुलांनी आणि फळांनी सजावट करण्यात आली. सगळ्यांनी मनोभावे देवीला हात जोडून आरती केली आणि मग खेळ खेळायला सुरुवात झाली. मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमायचे नसून चपलता देणारे, चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे असे म्हटले जाते आणि ते खरेच आहे. खेळ खेळताना सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह टिपण्यासारखा होता. नाच ग घुमा, झिम्मा, फुगडी, किस बाई किस, कोंबडा, लाटणं, फेर धरून नाचणे आणि आणखी काही खेळ खेळण्यात आले. खूप मज्जा आली.
विविध खेळ खेळतानाचे व्हिडिओ आणि फोटो काढायला आमच्या छोट्या मैत्रिणीने "सीया" ने खूप मदत केली. सीया कोथळे आमच्या मैत्रिणीची अकरावीत शिकणारी मुलगी आहे. पूजा झाली, खेळ झाले आणि नंतर सर्वांनी मनोसोक्त फोटोशूट केले. ग्रुप फोटो, वेगवेगळे प्रॉप्स घेऊन फोटो, वेगवेगळे पोझेस देऊन फोटो. सगळ्या मराठी मॉडेल्स वाटत होत्या. त्यात वरुणराजाने सुध्दा आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. पावसाच्या सरींना आमच्यासोबत खेळ खेळावस वाटत असेल कदाचित. पण पाऊस पडून गेल्यावर खेळ खेळून दमलेल्या सगळ्या मैत्रिणी परत प्रफुल्लित झाल्या. अंधार पडायच्या आत सगळ्यांनी मिळून सहभोजनाचा आनंद घेतला. हसत खेळत उखाणे घेत आनंदाने जेवण पार पडले. पूजेची आवरा आवरी करून सर्वांनी एकमेकींचा निरोप घेतला. अशाप्रकारे अमेरिकेतली पहिल्यांदा सामूहिक रित्या साजरी केलेली मंगळागौर आनंदाने आणि उत्साहाने पार पडली. संपूर्ण जगावर आलेले कोविडचे संकट दूर कर देवी मते हे मंगळागौरीकडे मागणे सगळ्यांनी अगदी मनोभावे मागितले. आपल्या देशाच्या लांब राहून आपली संस्कृती जपण्याचे समाधान तसेच आपले सण साजरा केल्याचा आनंद आणि त्या निमित्याने सगळी हौस पूर्ण केल्याचं सुख सगळ्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होतं आणि सगळ्या जणी आधीपेक्षाही अधिकच सुंदर दिसत होत्या.
लेखिका - सौ. अश्विनी तातेकर देशपांडेलेख संपादन - सौ. प्रिया जोशी