एका महिलेने एका रेस्टॉरंटविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, महिलेने जेवणाची ऑर्डर देताना अगोदर सलाड मागवले होते. मात्र, या सलाडमध्ये महिलेला माणसाचे बोट आढळून आले. विशेष म्हणजे ते तोंडात चावल्यानंतर ते बोट असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. एलिसन कोजी असं या महिलेचं नाव असून तिने एप्रिल महिन्यात हे सलाड ऑर्डर करुन खाल्ले होते. अमेरिकेच्या कनेक्टिकट येथील हे प्रकरण असून महिलेने याबाबत सोमवारी फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षातील एप्रिल महिन्यातील ७ तारखेला महिला रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी आली होती. मात्र, ऑर्डर केलेलं सलाड खाताना माणसाच्या बोटाच काही भाग दाताखाली असल्याची जाणीव महिलेला झाली. सीबीएस न्यूजच्या रिपोर्टनुसार, याप्रकरणी सांगण्यात आलं आहे की, रेस्टॉरंटच्या मॅनेजरकडून एक दिवस अगोदर सलाडसाठी भाजी कापत असताना चुकीने स्वत:चं बोट कापलं गेलं होतं. त्यानंतर, तो तुटलेल्या बोटावरील उपचारासाठी रुग्णालयातही गेला होता. मात्र, मॅनेजरचे तुटलेले बोट कापलेल्या भाजीतच राहिले होते.
मॅनेजरने भाजा कापलेलं तेच सलाड हॉटेलमधील अनेक ग्राहकांना खाण्यासाठी देण्यात आलं. त्यात, कोजीचाही समावेश होता. त्यामुळे, कोजीच्याच सलाडमध्ये त्या बोटाचा भाग आढळून आला.
दरम्यान, या प्रकारामुळे आपल्याला मोठा धक्का बसल्याचे कोजीने म्हटलं आहे. तसेच, पॅनिक होऊन हलकासा झटकाही आल्याचं तिने म्हटलं आहे. हे सलाड खाल्ल्यानंतर मायग्रेन, विसरभोळेपणा, चक्कर येणे, मान आणि खांद्यावर दु:खत असल्याचा त्रास होऊ लागला. या त्रासामुळे कोजीने नुकसानभरपाईची मागणी केली आहे. याप्रकरणी वेस्टचेस्टर काउंटी हेल्ड डिपार्टमेंटने रेस्टॉरंटवर ९०० डॉलरचा दंड ठोठावला आहे.