युद्ध सुरू होताच युक्रेन आणि युरोपवर अनेक सायबर हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 06:55 AM2022-04-01T06:55:19+5:302022-04-01T06:55:50+5:30

अमेरिकी कंपनीचा दावा; काही काळ यंत्रणांवर परिणाम

Many cyber attacks on Ukraine and Europe as soon as the war started | युद्ध सुरू होताच युक्रेन आणि युरोपवर अनेक सायबर हल्ले

युद्ध सुरू होताच युक्रेन आणि युरोपवर अनेक सायबर हल्ले

Next

वॉशिंग्टन : रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेन व युरोपातील अनेक देशांवरही सायबर हल्ले चढविण्यात आले होते. अमेरिकेतील व्हायासॅट या कंपनीने यासंदर्भात म्हटले आहे की, या सायबर हल्ल्यांमुळे युरोपमधील इंटरनेट प्रणालीवर चालणाऱ्या काही यंत्रणांवरही परिणाम झाला होता. मात्र हे हल्ले कुणी केले याबाबत व्हायासॅटने मौन बाळगले आहे. या कंपनीने सांगितले की, या सायबर हल्ल्यांमुळे पोलंडपासून फ्रान्सपर्यंत हजारो इंटरनेटधारकांच्या कामकाजात व्यत्यय निर्माण झाला. युक्रेनपासून युरोपपर्यंत अनेकांच्या इंटरनेट यंत्रणेतील मोडेममध्ये काही काळ बिघाड झाले. 
मोडेम हे एक हार्डवेअर उपकरण आहे. ज्याचा उपयोग संगणकाला केबल किंवा टेलिफोनच्या माध्यमातून डेटा पाठविण्यासाठी केला जातो. 

युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाच्या हॅकरनी सायबर हल्ले केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. त्याच वेळी व्हायासॅटच्या यंत्रणेवरही सायबर हल्ला झाला होता. या युद्धाच्या कालावधीतील आतापर्यंतचा तो सर्वात मोठा सायबर हल्ला आहे. 

आणखी सायबर हल्ले होण्याचा धोका
युक्रेन युद्धाच्या प्रारंभी झाले तसे सायबर हल्ले युरोपीय देश व युक्रेनवर यापुढेही होण्याचा धोका आहे. तशी शक्यता युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी युरोपने आपली इंटरनेट यंत्रणा आणखी मजबूत करण्याची तयारी केली आहे. 

युक्रेन, रशियात उद्यापासून पुन्हा चर्चा
युक्रेन व रशियामधील शांतता चर्चा उद्या, शुक्रवारपासून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पुन्हा सुरू होणार आहे. तुर्कस्थानमध्ये ठरलेल्या मुद्द्यांवर आता दोन्ही देशांतील चर्चेची पुढील फेरी होणार आहे.

रशियाचे परराष्ट्रमंत्री लावरोव भारतात दाखल
युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव यांचे भारतामध्ये गुरुवारी दोन दिवसांच्या दौऱ्याकरिता आगमन झाले. लावरोव हे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतील.

पुतिन यांची सल्लागारांकडून युद्धाबाबत दिशाभूल सुरू; अमेरिकेचा दावा

n    कीव्ह : युक्रेनच्या युद्धभूमीतील घटनांबाबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना त्यांचे सल्लागार चुकीची माहिती देत आहेत. त्यामुळे दिशाभूल झालेले पुतिन व रशियाचे वरिष्ठ लष्करी अधिकारी यांच्यात तणाव निर्माण झाल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. पुतिन रशियन लष्कराच्या कामगिरीबद्दल असमाधानी आहेत, असेही अमेरिकेने म्हटले आहे. 
n    यासंदर्भात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने सांगितले की, रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई शोईगू व पुतिन यांच्यातही मतभेद निर्माण झाले आहेत. याआधी सेर्गेई हे पुतिन यांच्या खूप विश्वासातले म्हणून ओळखले जात.
n    युक्रेनमध्ये रशिया त्याला हवी तशी आघाडी घेऊ शकलेला नाही. त्यामुळे रशियाच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या युद्धभूमीवरील कामगिरीबद्दल पुतिन यांच्या मनात किंतू निर्माण झाला आहे.

 

Web Title: Many cyber attacks on Ukraine and Europe as soon as the war started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.