कोणाचं नशीब कधी आणि कसं चमकेल हे सांगता येत नाही. एका रात्रीत एखादी व्यक्ती श्रीमंत, मालामाल झाल्याच्या अनेक घटना या चित्रपटामध्ये आपण पाहत असतोच. पण अशीच एक घटना आता समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील एका छोट्याशा गावात हिरे शोधण्यासाठी हजारो लोक एकत्र आल्याची घटना घडली आहे. क्वाजुलु-नताल प्रांतातील क्वाह्लथी गावात लोक हिऱ्याचा शोध घेत आहेत. परिसरात काही वेगळे रहस्यमयी दगड सापडल्यानंतर गावातील तब्बल 1000 हून अधिक लोकांनी आपलं नशीब आजमावण्यासाठी हिऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. रहस्यमयी दगड सापडत असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.
रहस्यमयी दगड हे क्वार्ट्ज क्रिस्टल (Quartz Crystal) असल्याचं म्हटलं जात आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मोठ्या संख्येने लोक हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले असून खोदण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेंडो सबेलो नावाच्या व्यक्तीने या शोधाला जीवनात येणारा मोठा बदल असं म्हटलं आहे. आता त्याला छोटी कामे करावी लागणार नाहीत आणि त्याचे आयुष्य बदलू शकेल. त्याच्यासारखे बरेच लोक आहेत जे हिरे शोधण्याच्या आशेने येथे खोदत आहेत असं म्हटलं आहे.
एका व्यक्तीने आपण आपल्या आयुष्यात हिरे कधीचं पाहिले नसल्याचं म्हटलं आहे. तसेच काहींनी जे काही दगड आहेत ते विकायला देखील सुरुवात केली आहेत. येथील दगडांची विक्री देखील सुरू झाली आहे. 100 ते 300 आफ्रिकन रँड म्हणजे (7.29 ते 25 डॉलर) असा दर दगडाला मिळतो आहे. सापडत असलेले दगड हे खरंच हिरे आहेत की नाही हे माहीत नाही. मात्र तरी देखील लोक जमीन खोदत आहेत. हिरे मिळतील या आशेने लोक - महिला, मुलांसह दूरवरून कुदळ-फावडं घेऊन गावात येत आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या खनिज संशोधन विभागाने हे हिरे असल्याला अद्याप पुष्टी दिलेली नाही. भूगर्भशास्त्रज्ञ आणि उत्खनन तज्ज्ञांचं एक पथक येथे पाठवलं जाईल आणि नमुने गोळा करून अभ्यास केला जाईल, असं सरकार सांगत आहे. हिरे मिळतील आणि नशीब बदलेल या आशेने रात्रंदिवस लोक येथे येऊन खोदत आहेत. त्यांना काहीतरी नक्की मिळेल ही आशा आहे. मात्र मोठ्या संख्येने लोक जमा झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका देखील आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.