करांगासेम (इंडोनेशिया) : खदखदणा-या ज्वालामुखीतून अत्यंत उष्ण राखेचे लोळ उठत असल्याने बालीच्या आंतरराष्टÑीय विमानतळ दुस-या दिवशीही बंद ठेवावा लागला. एकूण ४४५ उड्डाणे रद्द करण्यात आली असून, या ठिकाणी जवळपास ५९ हजार प्रवासी अडकले आहेत. दर सहा तासांनी स्थितीचा आढावा घेतला जात आहे.ज्वालामुखीचा कधीही उद्रेक होण्याची शक्यता असल्याने परिसरातील लोक घाबरले आहेत. अनेकांनी घरेदारे सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे. रिसॉर्ट बेटावर ज्वालामुखी खदखदत असल्याने माऊंट आगुंगभोवतालच्या हजारो नागरिकांनी पळ काढला आहे.ज्वालामुखीचा उद्रेक होण्याच्या इशाºयाची पातळी वाढविण्यात आली आहे. कधीही ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. धोक्याच्या व्याप्तीचा परिसर १० किलोमीटरपर्यंत वाढविला आहे. ज्वालामुखीतून आणखी तप्त राखेचे लोळ बाहेर निघू शकतात. जवळपास २२ गावे आणि एक लाख नागरिक भीतीखाली वावरत आहेत.तेथील भारतीयांना मदत करणार : स्वराजभारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जकार्तास्थित भारताचे राजदूत प्रदीप रावत यांच्यामार्फत बाली येथे अडकलेल्या भारतीयांना मदतीचे आश्वासन दिले. आम्ही बाली येथील विमानतळावर मदत केंद्र सुरू केले आहे. भारतीय दूतावासाशी सातत्याने संपर्कात आहोत. तेथे अडकलेल्या भारतीयांनी काळजी करू नये, असे स्वराज यांनी म्हटले आहे.
बालीच्या ज्वालामुखीतून राखेचे लोळ, अनेक प्रवासी विमानतळावर अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 1:12 AM