हनोई : व्हिएतनामची राजधानी हनोई येथील नऊ मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत अनेक जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात रॉयटर्सने अधिकृत वृत्तसंस्थेच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, व्हिएतनामची राजधानी हनोई येथील नऊ मजली इमारतीला बुधवारी आग लागल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच, अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांच्या आकड्याची पुष्टी केलेली नाही.
अधिकृत व्हिएतनाम न्यूज एजन्सी (व्हीएनए) ने सांगितले की, १५० रहिवासी असलेल्या इमारतीला मध्यरात्री आग लागली. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार पहाटे दोन वाजेपर्यंत (1900 GMT) आग आटोक्यात आणण्यात आली. याचबरोबर, न्यूज एजन्सी एपीच्या वृत्तानुसार, इमारतीला लागलेल्या भीषण आगीमुळे जवळपास दहाहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी अद्याप बचावकार्य सुरू असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच, घटनास्थळी अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल आहे.
याचबरोबर, बुधवारी पहाटे ५ वाजेपर्यंत इमारतीमधून ७० जणांची सुखरूप सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी ५४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अनेक मृत्यू जणांचा झाल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र, अद्याप मृतांच्या आकड्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, झोपायच्या वेळी धुराचे लोट दिसल्यामुळे त्याने बाहेर पाहिले असता आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना दोरीच्या सहाय्याने त्वरीत खाली आणण्यात आले.