वॉशिंग्टन : अमेरिकेने केलेल्या चुकांमुळे जगभर अनेक लोक ठार झाले आहेत, असे स्पष्ट मत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले असून, त्यांच्या विरोधकांनी त्याबद्दल त्यांच्यावर टीका केली आहे. अमेरिका काही निष्पाप देश नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले.आम्ही काय केले त्याकडे बघा. आम्ही खूप काही चुका केल्या आहेत. मी इराकमधील युद्धाच्या विरोधात अगदी सुरुवातीपासून होतो, असे ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अनेक चुका झाल्या ठीक आहे. परंतु अनेक लोक ठार झाले आहेत. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांना ‘मारेकरी’ म्हटले जात असल्याबद्दलचा संदर्भ देऊन ट्रम्प म्हणाले की आपल्याभोवती अनेक मारेकरी आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला आपला देश निष्पाप असल्याचे वाटते का असा प्रश्न ट्रम्प यांनी विचारला. ते म्हणाले, इसिसविरोधात लढण्यासाठी मला रशियाशी सहकार्य करायला आवडेल. मी पुतिन यांचा मान राखतो याचा अर्थ असा नाही की आम्ही दोघे सहमतच असू. मी अनेक लोकांचा मान राखतो याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्याशी सहमतच आहे. पुतिन हे त्यांच्या देशाचे नेते आहेत. रशियाबरोबर नसण्यापेक्षा त्यांच्यासोबत असलेले चांगले.
अमेरिकेमुळे अनेक लोक ठार
By admin | Published: February 07, 2017 2:17 AM