इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान सध्या चौफेर अडचणीत सापडताना दिसत आहेत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कधीही त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. पाकिस्तानमधील टॉपची तपास यंत्रणा त्यांच्या मागे हात धुवून लागली आहे. इम्रान खान या एजन्सीसमोर हजर झाले नव्हते. तसेच अवैध फंडिंगच्या प्रकरणातही त्यांनी नोटिशीला उत्तर दिलेलं नव्हतं. आता याबाबतच्या कारवाईला वेग आणून एजन्सी इम्रान खानला अटक करू शकते.
प्रसारमाध्यमांमधील रिपोर्टनुसार शनिवारी ही माहिती समोर आली. पाकिस्तानमधील द न्यूज या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय तपास यंत्रणा एफआयएने या संदर्भात शुक्रवारी इम्रान खान याला दुसरी नोटिस पाठवली. द न्यूजच्या रिपोर्टनुसार इम्रान खान याला गेल्या बुधवारी पहिली नोटिस पाठवली होती. मात्र त्यांनी एफआयएच्या टीमसमोर हजर होण्यास नकार दिला होता.
आता एफआयएच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, इम्रान खान याला अटक करण्याचा अंतिम निर्णय तीन नोटिस जारी झाल्यानंतर घेण्यात येईल. सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की, एफआयने माजी पंतप्रधानांच्या पक्षाशी संबंधित पाच कंपन्यांचा शोध घेतला आहे. या कंपन्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आणि बेल्जियममध्ये कार्यरत आहेत.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला सोपवण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये या कंपन्यांचा उल्लेख केलेला नाही. या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने सांगितले की, इम्रान खानचा पक्ष तहरीक ए इन्साफला भारतीय वंशाच्या एका व्यावसायिकासह ३४ विदेशी नागरिकांकडून नियमबाह्य रितीने पैसे मिळाले होते.