वॉशिंग्टन : नासाने परग्रहावरील मानवासाठी म्हणजेच एलियन्ससाठी अंतराळात मेसेज पाठविले असून, त्यात साउंड क्लाऊडवर पाठविलेल्या आॅडिओमध्ये मराठी व हिंदी संदेश पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. क्लाऊडमधील आॅडिओमधून नमस्कार असे शब्द ऐकू येतील. जर प्रत्यक्षात अंतराळातील दुसऱ्या ग्रहावर एलियन्स असतील व त्यांची ऐकण्याची क्षमता आपल्याप्रमाणेच असेल तर त्यांना हा नमस्कार नक्कीच ऐकू येईल. नासाने १९७७ साली प्रक्षेपित केलेल्या एका यानात साउंड क्लाऊडवर पृथ्वीवरील अनेक आवाज पाठविले आहेत. त्यात हिंदी, मराठीसह अनेक भाषांतील स्वागतपर शब्द आहेत. तसेच पृथ्वीवरील विविध आवाजांत पावसाची झिम्मड, आई व मुलाचे बोलणे, विविध पक्ष्यांचा चिवचिवाट, हृदयाची धडधड यांचा समावेश आहे. एखाद्या ग्रहावर खरेच एलियन्स असतील तर ते या आवाजाला प्रतिसाद देतील, काही आवाज त्यांच्या ओळखीचे असतील. साउंड क्लाऊडवर पाठविलेले संदेश ५५ भाषांत असून, प्रत्येक भाषेतील अभिवादन या तंत्रासाठी निवडण्यात आले आहे. भारतीय भाषांत मराठी, हिंदीखेरीज बंगाली भाषेचाही समावेश आहे.
एलियन्सना पाठविले मराठी, हिंदी संदेश
By admin | Published: August 01, 2015 4:50 AM