ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २ - विख्यात सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग व त्याची पत्नी प्रिसिला यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. 'मॅक्स' असे तिचे नाव ठेवण्यात आले असून फेसबूकवरील एका पोस्टद्वारे मार्कने मुलीच्या जन्माची आनंदाची बातमी सर्वांशी शेअर केली आहे. विशेष म्हणजे ही बातमी देतानाच झुकेरबर्ग दांपत्याने फेसबूकचे ९९ टक्के शेअर्स दान करण्याचा निर्णयही जाहीर केला आहे.
मार्क व प्रिसिलाने त्यांच्या मुलीसाठी लिहीलेलं एक पत्रही फेसबूकवर शेअर केले आहे. ' मॅक्स, आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यासाठी आणि तुझ्यासारख्या असंख्य चिमुरड्यांसाठी हे जग सुखकर आणि आनंददायी बनवण्याची आमची जबाबदारीआहे. तू आम्हाला जो आनंद, प्रेम दिलंस तेच तुला भरभरुन लाभो अशा शुभेच्छा.’ असे सांगत मार्कने फेसबुकवर आपला आनंद व्यक्त केला आहे. तसेच या सर्व काळात आपल्याला भरभरून शुभेच्छा व पाठिंबा देणा-यांचेही मार्कने मनापासून आभार मानले आहेत.
मार्कने मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांची पॅटर्निटी लीव्ह घेण्याची घोषणा केली होती. फेसबुकच्या सीईओने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं तर बहुसंख्य लोकांनी त्याच्या निर्णयाचे स्वागत करत त्याचं भरभरून कौतुक केलं. तर आता मार्क व प्रिसेलाने कंपनीचे ९९ टक्के शेअर म्हणजे जवळपास साडेचार हजार कोटी डॉलर दान करणार असल्याची घोषणा केली आहे.