मुंबई - पोर्तुगालचे 71 वर्षीय राष्ट्रपती आपल्या धाडसी कार्यामुळे सध्या चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनले आहेत. मार्सेलो रेबेलो डी सूसा यांनी शनिवारी अलगर्व बीचवर बुडणाऱ्या दोन मुलींना स्वत: पोहत जाऊन वाचवले. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या या मुलींची नाव समुद्रातील लाटांच्या प्रभावामुळे पलटी झाली होती. त्यावेळी, त्याच बीचवर समुद्र स्नानाचा आनंद घेणाऱ्या मार्सेलो रेबेलो डी सूसा यांनी तत्काळ मुलींजवळ जाऊन एका व्यक्तीच्या मदतीने या दोन्ही मुलींना वाचवले.
कोरोनाच्या महामारीमुळे देशभरातील पर्यटन कोलडमडले आहे. त्यामुळे, देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सूसा यांनी पर्यटन दौरा आयोजित केला आहे. देशातील पर्यटनाला गती मिळण्यासाठी ते पर्यटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी, अलगर्व बीचवर या दोन मुली पाण्याच्या प्रवाहात फसल्या होत्या. या प्रवाहातून या मुली परिआ डो अल्वोर येथपर्यंत वाहत आल्या. याचवेळी समुद्रात मोठ्या लहरी उसळल्या होत्या. त्यामुळे, पाण्यात पोहोण्यासाठी त्यांना अडचण निर्माण झाली. राष्ट्रपती सूसा यांना ही घटना लक्षात येताच त्यांनी समुद्रात उडी घेतली.
समुद्रातून उतरुन पोहोत-पोहोत राष्ट्रपती डी सूसा त्या मुलींजवळ पोहोचले. त्यानंतर, एका बोटीच्या सहाय्याने त्यांनी या मुलींचा जीव वाचवला. यावेळी बोट घेऊन येणाऱ्या घटनास्थळी आलेल्या व्यक्तीचं अभिनंदन करत, त्यास देशभक्त असल्याचं डी सूसा यांनी म्हटलं. तर, संबंधित मुलींना समुद्रात उतरतेवेळी काळजी घेण्याचं बजावलं. राष्ट्रपती मर्सेलो हे ह्रदयरोगाचे रुग्ण असूनही त्यांनी हे धाडस दाखवलं. त्यामुळे, देशभरातून त्यांचं कौतुक होत आहे. तसेच, त्यांच्या या धाडसी घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.