वॉशिंग्टन : यंदाचा मार्च महिना आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण ठरला आहे. अमेरिकी सरकारच्या एका विभागाने हा निष्कर्ष काढला आहे. जागतिक तापमानवाढीच्या इतिहासात यामुळे आणखी एका उच्चांकाची नोंद झाली आहे.नॅशनल ओशियानिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एनओएएच्या मते, मार्च २०१५ मध्ये सरासरी जागतिक तापमान १८८० नंतर सर्वाधिक राहिले. उल्लेखनीय म्हणजे, १८८० सालापासून तापमानाची नोंद ठेवण्यास प्रारंभ झाला होता. एवढेच नाहीतर २०१५ ची पहिली तिमाही आतापर्यंत, म्हणजे १३६ वर्षांतील सर्वाधिक उष्ण तिमाही म्हणून नोंद झाली. याआधी २००२ ची पहिली तिमाही सर्वाधिक उष्ण म्हणून ओळखली जात. दरम्यान, २०१४ ची सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून नोंद आहे. आतापर्यंतच्या तापमान कलानुसार २०१५ ची सर्वाधिक उष्ण वर्षाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासाच्या जागतिक तापमान निर्देशांकानुसार, गेल्या १० वर्षांत तापमानात मोठी वाढ होत आहे. १९१० पासूनच्या तापमान नोंदीचे विश्लेषण केल्यास हा कल स्पष्टपणे दिसून येतो. १९५० नंतर जागतिक पातळीवर हवामानात काही अभूतपूर्व बदल झाले आहेत. मार्च २०१५ मध्ये तापमानात ०.०९ डिग्री म्हणजेच ०.०५ फॅरेनहाईट एवढी वाढ नोंदली गेली आहे. याआधी २०१० मधील मार्च महिना सर्वाधिक उष्ण म्हणून ओळखला जात होता. तापमानवाढीमुळे आर्क्टिक समुद्रातील बर्फ वितळण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे; मात्र मार्चमध्ये आर्क्टिक समुद्रातील बर्फ वितळण्याच्या प्रमाणात घट नोंदली गेली आहे. १९८१ ते २०१० च्या सरासरीच्या तुलनेत मार्चमध्ये केवळ ४३०,००० चौरस मैल अर्थात ७.२ टक्के बर्फ वितळले. पृथ्वीवरील वातावरणात हरितगृह वायू अर्थात ग्रीन हाऊस गॅसेसच्या प्रमाणात यंदाच्या मार्च महिन्यात विक्रमी वाढ नोंदली गेली आहे. (वृत्तसंस्था)
मार्च महिना ठरला सर्वाधिक उष्णतेचा
By admin | Published: May 11, 2015 11:32 PM