Mark Zuckerberg's Apology: मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्या फेसबुकवर अनेकदा विविध प्रकारचे आरोप लागले आहेत. यामुळे कंपनीला कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागले आहे. आता ताजे प्रकरण न्यूडीटी आणि शोषणासंदर्भातील आहे. अमेरिकेतील सिनेटमध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी मेटा प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांना सर्वांसमोर पीडित कुटुंबियांची माफी मागावी लागली. नेमकं काय झालं?
अमेरिकन सिनेटमध्ये इंस्टाग्राम न्यूडीटी आणि शोषणासंबंधी सुनावणी सुरू होती. मुलांचे नुकसान/शोषण होऊ नये, यासाठी मेटाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप पीडित कुटुंबांनी केला. कॅपिटल हिलच्या हाऊस फ्लोअरवर झालेल्या सुनावणीदरम्यान, मेटा प्रमुखाला सिनेटकडून सांगण्यात आले की, इंस्टाग्रामवर 13 ते 15 वर्षे वयोगटातील 37 टक्के मुलींना एका आठवड्यात अचानक न्यूडीटी आणि शोषणाचा सामना करावा लागला. यावर त्यांनी कोणती कारवाई केली आणि जबाबदार व्यक्तीला नोकरीतून काढून टाकले का?
यावेळी यूएस सिनेट न्यायिक समितीचे सदस्य जोश हॉले यांनी झुकेरबर्ग यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. पालकांचे गंभीर आरोप आणि सिनेटचे प्रश्न ऐकून मार्क यांचा चेहरा फिका पडला, त्यांना एकाही प्रश्नाचे नीट उत्तर देता आले नाही. अनेकवेळा प्रश्न विचारल्यानंतर झुकरबर्ग म्हणाले, मी याचे उत्तर देणार नाही. यावर आता बोलणे योग्य नाही. यानंतर जोश यांनी मेटावर गंभीर आरोप करणाऱ्या पीडित कुटुंबीयांची माफी मागण्याचा दबाव झुकेरबर्ग यांच्यावर टाकला.
अखेर मागितली माफी यानंतर सिनेट म्हणाले, तुम्ही कोणतीच कारवाई केली नाही. ना कुणाला काढले, ना एकाही पीडित कुटुंबाला नुकसान भरपाई दिली. सध्या पीडितांची कुटुंबे इथे आली आहेत, तु्ही आज तरी या लोकांची माफी मागणार का? हे ऐकून मार्क झुकरबर्गची जीभ अडखळली. जोश हॉले त्यांच्यावर वारंवार माफी मागण्यासाठी दबाव टाकत होते. मार्क यांना काहीच बोलता अले नाही. अखेर मेटा सीईओ मागे वळाले आणि तिथे उपस्थित पीडितांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. सुनावणीदरम्यान सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनीही मेटा सीईओवर ताशेरे ओढले.
सोशल मीडिया कंपन्यांवर काय आरोप?मेटा सीईओ व्यतिरिक्त, स्नॅप इंकचे सीईओ इव्हान स्पीगल यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढल्याबद्दल पीडितांच्या कुटुंबियांची माफी मागितली. दरम्यान, अमेरिकेतील वाढत्या ऑनलाइन गुन्ह्यासंदर्भात ही सुनावणी होती. मार्क झुकरबर्ग व्यतिरिक्त X, Snap, TikTok यासह अनेक कंपन्यांचे अधिकारी कॅपिटल हिलमध्ये उपस्थित होते. या कंपन्यांवर आरोप आहे की, त्यांनी असे काही फीचर तयार केले आहे, ज्यामुळे बालगुन्हे आणि आत्महत्यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे.