इस्लामाबाद : इम्रान खान (Imran Khan) यांच्या धमकीच्या पत्राबाबत (Threat Letter) पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज (Maryam Nawaz) यांनी मोठा दावा केला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ज्या पत्राच्या मदतीने परदेशी षड्यंत्राचा आरोप केला होता, ते पत्र परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी तयार केले होते. म्हणजेच इम्रान खान यांनी स्वतःच त्यांच्या कर्मचार्यांकडून पत्र लिहून घेतले, जेणेकरून 'षड्यंत्र' सांगून जनतेची दिशाभूल केली जाऊ शकेल, असे मरियम नवाज यांनी म्हटले आहे.
पत्र दाखवत का नाहीत इम्रान खान?वेबसाइट WION मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान इम्रान खान कथित धमकीचे पत्र का दाखवत नाहीत? असा सवाल मरियम नवाज यांनी केला आहे. तसेच, इम्रान खान यांना धमकीचे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे मरियम नवाज यांनी सांगितले. इम्रान खान यांनी स्वत: एक पत्र तयार करून घेतले आणि परकीय कारस्थानाचा आरोप करून देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
ब्रुसेल्सला राजदूत पाठवण्याबाबत सवालइम्रान खान यांचा खरपूस समाचार घेत मरियम नवाज म्हणाल्या की, इम्रान खान यांच्याकडून सांगण्यात आले होते की अमेरिकेत तैनात पाकिस्तानी राजदूताला हे धमकीचे पत्र मिळाले होते, मग त्यांना ब्रसेल्सला का पाठवले? राजदूताला सर्वोच्च न्यायालयात हजर करावे, अशी आमची मागणी आहे. मरियम नवाज यांनी लाहोर येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, इम्रान खान यांनी पत्र लिहिण्याच्या एक दिवस आधी, अमेरिकेतील पाकिस्तानच्या राजदूताला अचानक ब्रसेल्सला पाठवण्यात आले होते. असे का केले? याचे उत्तर इम्रान खान यांना द्यावे लागेल.
'इम्रान खान यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला जाईल'पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (एनएससी) व्यासपीठाचा गैरवापर केल्याचा दावा मरियम नवाज यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की. एनएससीच्या अधिकृत निवेदनात परकीय षड्यंत्राचा उल्लेख नाही. हे पत्र परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनीच लिहिले आहे. मरियम नवाज पुढे म्हणाल्या की, इम्रान खान देशद्रोही आहेत आणि त्याच्यावर भविष्यात देशद्रोहाचा खटला चालवला जाईल.