वॉशिंग्टन - अमेरिकेतील एका इमारतीत करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर अनेक जण जखमीदेखील झाले आहेत. मेरिलँडमधील अनापोलिस येथील ही घटना आहे. येथे असलेल्या कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राच्या कार्यालयात या गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबार केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका बंदुकधारी व्यक्तीने कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती कॅपिटल गॅझेटचे एक पत्रकार फिल डेव्हिस यांनी ट्विटरवर दिली.
पत्रकार परिषदेदरम्यान पोलिसांनी सांगितले की, कॅपिटल गॅझेट वृत्तपत्राच्या कार्यालयाला लक्ष्य करुनच हा हल्ला करण्यात आला. मात्र हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. सोशल मीडियाद्वारे हल्ल्याची धमकीदेखील मिळाली होती.
दरम्यान, अमेरिकेत गोळीबारींच्या घटनांमुळे बंदूक बाळगण्याचा कायदा अधिक कडक करण्याची मागणी करण्यात येत आहे. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये फ्लोरिडा येथील हायस्कूलमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात 17 जणांचा आणि मे मध्ये टेक्सासच्या एका शाळेत झालेल्या गोळीबारामध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला होता.