श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील एका न्यायालयाने हुरियत कॉन्फरन्सचा कट्टरवादी नेता मसरत आलम भटचा जामीन अर्ज शनिवारी फेटाळला.या फुटीरवादी नेत्याचे वकील शबीर अहमद भट यांनी ही माहिती दिली. आलमची याचिका नेमक्या कुठल्या आधारे फेटाळण्यात आली हे सविस्तर आदेश प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे ते म्हणाले. ४५ वर्षीय आलमला गेल्या आठवड्यात देशद्रोह आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. गुरुवारी लोक सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर त्याला जम्मूच्या कोटभलवाल कारागृहात स्थानांतरित करण्यात आले होते. हुरियत कॉन्फरन्सच्या कट्टरपंथी गटाचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या स्वागतासाठी गेल्या १५ एप्रिलला हैदरपोरा येथे आयोजित सभेत पाकिस्तानी ध्वज फडकवून भारतविरोधी घोषणाबाजी केल्याच्या आरोपात आलमला दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
मसरत आलमला जामीन नाकारला
By admin | Published: April 26, 2015 1:49 AM