ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 28 - पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर दहशतवादी असल्याचं सांगत त्याला आश्रय देणा-या नवाज शरीफ सरकारच्या अडचणी वाढवल्या आहेत. मसूद अजहर दहशतवादी असून देशात झालेल्या अनेक स्फोटांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं परवेझ मुशर्रफ बोलले आहेत. मात्र मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यासाठी पाकिस्तान चीनला सांगत का नाही यावर मात्र त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं नाही. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मुशर्रफ यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मसूद अजहरशी काही संबंध नसताना चीनने यामध्ये पडण्याची काही गरज नाही असं परवेझ मुशर्रफ बोलले आहेत. पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला करणा-या जैश-ए-मोहम्मद संघटनेचा म्होरक्या मसुद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यास चीनने विरोध केला आहे. चीन केलेल्या या विरोधावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. चीनने प्रतिबंध करण्याचा (व्हेटो) अधिकार वापरत हा विरोध केला होता.
मुशर्रफ यांनी नवाज शरीफ सरकारवर टीका करत हे सरकार कमी पडत असल्याचं म्हटलं आहे. तसंच पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशी झाल्याचंही त्यांनी मान्य केलं. मात्र याचा अर्थ पाकिस्तानला गृहित धरु नका असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पाकिस्तानच्या विकासासाठी राजकीय नेतृत्व हवं की लष्कराचं ? या प्रश्नावर उत्तर देताना लष्कर सत्तेत असताना पाकिस्तानचा विकास झाल्याचा दावा त्यांनी केला. सर्जिंकल स्ट्राईकसंबंधी बोलताना पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत, त्यामुळे खोड काढू नये अशी धमकी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अचानक पाकिस्तान भेटीबद्दल बोलताना ही एक कृत्रिम चाल होती. जर काही उपाय करायचा असेल तर खूप महत्वाची पाऊलं उचलावी लागतील असं ते म्हणाले आहेत.