इस्लामाबाद : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा पाकिस्तानातच असल्याची कबुली पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली आहे. पण, त्यांचे असे म्हणणे आहे की, भारताने ठोस पुरावे दिल्यासच सरकार त्याच्याविरुद्ध काही पावले उचलू शकते. दरम्यान, मसूद अझहर सध्या एवढा आजारी आहे की, घराच्या बाहेरही निघू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढलेला असताना कुरेशी यांचे हे विधान आले आहे. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी जैशने स्वीकारलेली आहे. कुरेशी म्हणाले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, अझहर पाकिस्तानातच आहे. तो सध्या एवढा आजारी आहे की, घराच्या बाहेरही निघू शकत नाही. अझहरचा समावेश संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीत करावा, अशी मागणी भारताने दीर्घकाळापासून केली आहे. पाकिस्तानचा सहयोगी चीन आपल्या व्हेटो अधिकाराचा उपयोग करून वारंवार या प्रयत्नांमध्ये अडथळे आणत आहे. (वृत्तसंस्था)पुराव्यांची भाषा सुरूचकुरेशी यांनी हेही सांगितले की, न्यायालयात सादर करण्यासारखे पुरावे दिल्यास पाकिस्तान त्याच्याविरुद्ध पावले उचलेल. आम्हाला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांना सोपविण्याचा निर्णय हा शांततेच्या मार्गातील एक पाऊ ल असल्याचे कुरेशी म्हणाले. तणाव कमी करण्याची पाकिस्तानची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.