नवी दिल्ली : जैश- ए- मोहंमदचा प्रमुख मसूद अझहर हा दहशतवादीच असल्याचे मत माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांनी व्यक्त केले. मसूदचा पाकिस्तानातील बॉम्बस्फोटांतही सहभाग असल्याचे ते म्हणाले. मुशर्रफ एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. अझहर जर दहशतवादी आहे, तर मग संयुक्त राष्ट्रामार्फत त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास आडकाठी आणू नये, असे पाक चीनला का सांगत नाही, या प्रश्नाला त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. चीनचा अझहरशी संबंध नाही, एवढेच ते म्हणाले. अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसमोर प्रलंबित आहे. तथापि, चीनने अझहरला दहशतवादी सिद्ध करणारे पुरेसे पुरावे नसल्याचे दावा करून या प्रस्तावाला आडकाठी आणली आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या कर्मचाऱ्याचा सहभाग असलेले हेरगिरी प्रकरण दिल्लीत उघड झाले आहे. त्याबाबत छेडले असता मला यासंदर्भात माहिती नाही, असे सांगून मुशर्रफ यांनी प्रारंभी उत्तर देणे टाळले. तथापि, नंतर ते म्हणाले की, जर हे घडले आहे, तर मी एवढेच म्हणेन की, अशा गोष्टींना प्रोत्साहन मिळायला नको. नवाज शरीफ सरकारकडे आक्रमकतेचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)पाक सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्देगिरीत अपयशी ठरल्याचे मुशर्रफ यांनी मान्य केले. तथापि, याचा अर्थ असा नाही की, पाकिस्तानला गृहीत धरता येईल. पाकच्या विकासासाठी राजकीय नेतृत्व उपयुक्त आहे की, लष्करी या प्रश्नावर लष्करी नेतृत्व सत्तेवर असताना देशाची वाढ झाली होती, असे उत्तर मुशर्रफ यांनी दिले. आम्हीही अण्वस्त्रसज्ज आहोत!भारताच्या लक्ष्यभेदी हल्ल्यासंदर्भात विचारले असता मुशर्रफ म्हणाले की, पाकिस्तान हा शक्तिशाली लष्करासह एक अण्वस्त्रसज्ज देश असून, त्याला पाहिजे तसे वाकवता येईल, अशा भ्रमात कोणी राहू नये.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अचानक पाकिस्तान दौरा आणि त्यांनी शरीफ यांची घेतलेली भेट याबाबत विचारले असता मुशर्रफ म्हणाले की, हस्तांदोलन ही कृत्रिम, औपचारिक गोष्ट आहे. काहीतरी ठोस करण्याची गरज आहे.
मसूद अझहर दहशतवादीच
By admin | Published: October 29, 2016 2:45 AM