इस्लामाबाद : ‘जैश-ए- मोहम्मद’ चा प्रमुख अजहर मसूद याला दहशतवादी घोषित करण्याच्या फ्रान्स, ब्रिटन व अमेरिका यांच्या संयुक्त प्रयत्नाला पाकिस्तान विरोध करणार नाही, असे संकेत पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिले. जियो टीव्हीशी बोलताना कुरेशी म्हणाले की, पाकिस्तानसाठी स्वत:च्या हिताचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी गत आठवड्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नव्याने प्रस्ताव ठेवला होता. याबाबत १० दिवसांच्या आत निर्णय होणार आहे.दरम्यान, पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या संघटनांवर अंकुश लावण्यासाठी आणि त्यांची आर्थिक रसद थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दबाव वाढत असताना पाकने अशा व्यक्ती व संघटनांविरुद्ध संयुक्त राष्ट्रांचे प्रतिबंध लागू करण्यास सोमवारी कायद्याची घोषणा केली.पाकिस्तानने दस्तावेज फेटाळलेसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेकडून दहशतवादी घोषित केलेल्या व्यक्ती आणि संघटनांविरुद्ध कारवाईसाठी पाकिस्तानवर दबाव वाढत असताना भारताने जैशविरुद्ध कारवाईसाठी काही दस्तावेज सोपविले होते. पण सोमवारी पाकिस्तानने हे दस्तावेज फेटाळून लावल्याचे वृत्त आहे.तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी जैशचा प्रमुख मसूदसह अतिरेकी संघटनांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या संघटनेविरुद्ध कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते.
‘मसूदला दहशतवादी जाहीर करण्यास विरोध करणार नाही’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 4:19 AM